भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 20, 2022 03:53 PM2022-07-20T15:53:56+5:302022-07-20T15:54:24+5:30
आजर्याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली
सिंधुदुर्ग : दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी (४२) हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग शिंदे (३५) रा.आजरा याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. हा अपघात आज, बुधवारी सकाळच्या सुमारास नांगरतास-दहीचाव्हाळ येथे घडला.
दरम्यान जखमीसह मृताला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आणण्यात आले आहे. दोघेही आजर्याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, यातील मृत बागडी आणि शिंदे हे आजरा येथे राहतात. ते नेहमी प्रमाणे आज कामासाठी दुचाकीने आंबोलीच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणार्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की बागडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिदे यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली.
अशा अवस्थेत त्या ठिकाणी जमलेल्या काही ग्रामस्थ व प्रवाशांनी त्या दोघांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु बागडी यांचा पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला. असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. जखमी शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडीकडे पाठविण्यात आले आहे.
या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा सुरू केला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच आंबोली शाखेचे व्यवस्थापक शाम पोकळे यांनी धाव घेवून त्यांना मदतकार्य केले. यावेळी पोलीस दीपक शिंदे, अभिजित कांबळे, संभाजी पाटील उपस्थित होते.