आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 11:08 PM2023-05-06T23:08:54+5:302023-05-06T23:09:17+5:30
कर्नाटक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होता तैनात.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून छत्तीसगड रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे ते एकूण पाच जण सर्व छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले पोलिस गोव्याला पर्यटनासाठी म्हणून शनिवारी सकाळी गेले होते. यातील मितीलेस पॅकेरा (३५) या पोलिसाचा दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास गोव्याहून पर्यटन करून परतत असताना हे सर्व पोलिस लघुशंकेला म्हणून आंबोली घाटातील धबधबे जवळील एका वळणावरती थांबले. त्यातील तिघेजण लघुशंकेसाठी उतरले त्यातील मीतेलेस पॅकेरा हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास ३०० फूट खोल खाली कोसळला.
रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे त्याच्यासोबत होते त्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी लागलीच आंबोली पोलिस स्थानकातील दत्तात्रय देसाई यांना संपर्क केला. दत्ता देसाई यांनी आंबोली रेस्क्यू टीम व स्वतः घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ ३० मिनिटात खाली दरीत उतरत वाचवण्याचा प्रयत्न केला.
ज्यावेळी रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर, मायकल डिसोजा हे खाली पोहोचले त्यावेळी थोडाफार प्राण त्याच्यामध्ये शिल्लक असल्याचे सांगितले. परंतु काही काळाने तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला.
याबाबतची माहिती त्याच्या वरिष्ठांना देण्यात आली असून त्याचे वरिष्ठ कर्नाटक येथून येण्यास रवाना झाले आहेत. आंबोली रेस्क्यू टीम मार्फत व आंबोली पोलिस स्थानक पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे, दीपक नाईक आदी यांनी घटनास्थळी जात तत्परतेने बचाव कार्यास मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे. उद्या रविवारी मृतदेहाचे सर्वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.