दुर्देवी! रस्त्यात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून वृध्दाचा जागीच मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 8, 2022 06:24 PM2022-09-08T18:24:40+5:302022-09-08T18:25:20+5:30
दळण घेवून पायी जात असताना घडली दुर्घटना
देवगड (सिंधुदुर्ग) : दळण घेऊन पायी जात असताना रस्त्यात तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन बापर्डे येथील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दीनानाथ वसंत गायकवाड (वय-६८, रा. गायकवाडी,) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी घडली. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बापर्डे गायकवाडवाडी येथील दीनानाथ गायकवाड हे घरापासून काही अंतरावरती असलेल्या पिठाच्या गिरणीवरती दळण घेवून पायी जात होते. बापर्डे हेळयाची भाटी येथे ओहोळाच्या किनारी विदयुत वाहिन्यांच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या.
या तारांना गायकवाड यांचा स्पर्श होवून विजेच्या धक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती देवगड पोलीस ठाण्यामध्ये श्रीकांत दिनानाथ गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास देवगड पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करीत आहेत.