आनंदीबाई जोशी पुरस्कार प्रेरणादायी

By Admin | Published: March 29, 2016 10:38 PM2016-03-29T22:38:40+5:302016-03-30T00:04:17+5:30

डॉ. तुषार भागवत : शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले

Anandibai Joshi award inspirational | आनंदीबाई जोशी पुरस्कार प्रेरणादायी

आनंदीबाई जोशी पुरस्कार प्रेरणादायी

googlenewsNext



दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल होणाऱ्या कोणत्याही रूग्णाचा उपचाराविना प्राण जाऊ नये, हेच तत्व वैद्यकीय क्षेत्रात प्रमाण मानले जाते. त्यामुळे या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तो गरीब, श्रीमंत पाहिला जात नाही. आधी त्याच्यावर उपचार केले जातात. माझ्या हातून ईश्वररुपी रुग्णांची सेवा घडते आहे. अनेकवेळा जेवणाचे ताट बाजूला सारुन रुग्णांची सेवा केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे, हे आमचे यश मानतो.

कष्ट केल्यावर फळाची अपेक्षा केली जाते, परंतु आम्ही नि:स्वार्थीपणे केलेल्या सेवेमुळेच आनंदीबाई पुरस्कार मिळाला.
- डॉ. तुषार भागवत


रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी केवळ रुग्ण सेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम सुरु आहे. आमच्या हातून रुग्णांची सेवा घडणे हे आमचे भाग्य आहे. पर्सनल लाईफमध्ये निवांत फिरायला जाणे किंवा एन्जॉय करणे दूरच राहिले, परंतु घरी निवांत दोन घास खाणे किंवा देवासमोर सकाळी सकाळी हात जोडून उभेसुद्धा राहता येत नाही. कधीही कॉल आला की, सर्व कामे बाजूला सारुन आम्ही रुग्णसेवेसाठी तत्पर असतो. त्याचेच फलीत म्हणून आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. आमच्या कामाची दखल घेतल्याचे समाधान वाटत असल्याचे दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ‘लोकमत’शी थेट संवाद साधताना म्हणाले.
प्रश्न : उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय का?
उत्तर : काही वर्षांपूर्वी सरकारी दवाखान्याची अनास्था होती. अपुरा कर्मचारीवर्ग व रुग्णांची संख्या अधिक असे गुणोत्तर होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचारसुद्धा होत नसावेत. कारण प्राथमिक आरोग्य केंंद्रात तज्ज्ञ डॉक्टर नसायचे. तपासणी यंत्राचा अभाव, कर्मचारी संख्या अपुरी, अपुरा औषधसाठा यामुळे सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची थोडीफार गैरसोय होत असावी. या दवाखान्यात फक्त गरीब वर्गातील लोकच येत होते.
परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. दापोली उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण केला गेला आहे. आता या रुग्णालयात गरीब, सर्वसामान्य, श्रीमंत सर्वच वर्गातील लोक येतात. त्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. केवळ संख्या वाढली नाही तर लोकांचा उपजिल्हा रुग्णालयातील उपचारावर विश्वासही बसला आहे. कारण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर गुण आला तरच लोक परत त्या ठिकाणी जातात. हेच वैद्यकीय क्षेत्रात घडते. आम्ही केलेल्या उपचारामुळे रुग्ण बरे होतात. हा विश्वास आम्ही रुग्णांच्या मनात निर्माण करु शकलो, त्यामुळेच रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रश्न : उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य तपासणी मशिन्सची कमतरता आहे का?
उत्तर : उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ अशा आवश्यक तज्ज्ञांची कमतरता आहे, काही मशीन्स आहेत, परंतु त्यासाठी तज्ज्ञ नाही. आम्ही ओपीडीवर अधिक भर दिलाय. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काही तज्ज्ञ डॉक्टर, मशीन्स मिळायला हवेत. कर्मचारी संख्या अजूनही कमी आहे. उपजिल्हा रुग्णालय आता १०० कॉटेजचे होणार आहे. सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त इमारत होण्याची गरज आहे. तसे झाले तर एकाही रुग्णाला डेरवण, मुंबई वा पुण्याला पाठवण्याची वेळ येणार नाही. पुणे, मुंबई, मिरज, डेरवणसारख्या ठिकाणी रुग्णांना पाठवले जाते. या ठिकाणी होणारा खर्च परवडत नाही किंवा हे अंतर लांबचे असल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट अर्ध्या रस्त्यातच दगावतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी दवाखाने पूर्ण क्षमतेने सुरु होणे गरजेचे आहे. तरच गरिबाला उपचार मिळू शकेल. आजही अनेक रुग्ण उपचारासाठी पैसे नसल्याने दगावत असल्याचे आपण पाहतो.
प्रश्न : रूग्णालयात आॅपरेशन केले जातंय का?
उत्तर : दापोली उपजिल्हा रूग्णालय असे आहे की, या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. गर्भवती स्त्रियांची शस्त्रक्रिया असो की, इतर कोणतीही शस्त्रक्रिया असो सर्जनद्वारे केली जाते. गरिबांना शस्त्रक्रियेचा खर्च खासगी रुग्णालयात परवडणारा नसतो. त्यामुळे गरीब लोक सरकारी रुग्णालयावर विसंबून असतात. अशावेळी त्यांचे समाधान करणे हेच आमचे कर्तव्य बनते. या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा मूलभूत अधिकार मिळायला हवा.
प्रश्न : तुम्ही एक सर्जन आहात, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाबद्दल समाधानी आहात का?
उत्तर : उपजिल्हा रुग्णालयातील एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी व सर्जन म्हणून मी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाबद्दल समाधानी आहे. कारण प्रत्येक कर्मचारी निष्ठेने काम करीत आहे. आपले कर्तव्य म्हणून सेवा दिली जात आहे. मी एक सरकारी नोकरदार आहे, ही भावना कधीच गळून पडली. आम्ही पेशंटचे सेवक आहोत. ड्युटी असो अथवा नसो, कधीही चोवीस तास सेवेसाठी तत्पर आहोत.
आमच्या मनात सेवाभाव आहे. सेवाभावी वृत्तीने काम केले जात आहे. त्यामुळेच मी अनेक कठीण केसेस हाताळून त्यांना जीवदान दिले आहे. मी माझे भाग्य समजतो, एखाद्याचे संकटकाळी मी प्राण वाचवू शकलो.
ही बाब माझ्यासाठी लाखमोलाची आहे. रूग्णालयातील कामकाज पाहूनच हा पुरस्कार मिळाला आहे. आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन कामाची घेतलेली दखल आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
- शिवाजी गोरे, दापोली

Web Title: Anandibai Joshi award inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.