देवगडच्या विकासातील केंद्रबिंदू आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:34 PM2019-05-27T15:34:46+5:302019-05-27T15:36:43+5:30
देवगडच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून भाजपा नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. यावेळी डी. व्ही. पी. कंपनीच्या प्रतिनिधींकडून या प्रकल्पाचा आराखडा व अन्य बाबींची माहिती त्यांनी घेतली.
देवगड : देवगडच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून भाजपा नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. यावेळी डी. व्ही. पी. कंपनीच्या प्रतिनिधींकडून या प्रकल्पाचा आराखडा व अन्य बाबींची माहिती त्यांनी घेतली.
तत्पूर्वी त्यांनी आनंदवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या कामात स्थानिक ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे असून स्थानिकांना विश्वासात घेत हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेवक प्राजक्ता घाडी, राजेंद्र वालकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, संजय बांदेकर, हनुमंत कुबल, किशोर कुबल, सुदेश धुरी, गुरुनाथ कुबल, गुरुनाथ तारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या चर्चेत प्रामुख्याने आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू झाले असून या प्रकल्पाच्या कामात स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार, व्यापारी या सर्वांचे सहकार्य असून येथील प्रकल्पाचे काम स्थानिक व्यवसायास बाधा न येता पूर्णत्वास नेणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. प्रकल्पासंदर्भात जनतेशी सुसंवाद साधणे व जनतेपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असून या प्रकल्पावर सुमारे ८२ कोटींहून अधिक खर्च होत असताना यात ८५० मीटर लांबीच्या भागाचा तसेच २८० पीलरचा समावेश आहे.
सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या लायनिंगचे काम सुरू झाले असून बंदर प्रकल्पामुळे मच्छिमारांना विविध सोयीसुविधा निर्माण होणार असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम भाजपा-शिवसेना युतीच्या नेत्यांच्या माध्यमातून मार्गी लागले असून यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, खासदार विनायक राऊत यांचे विशेष प्रयत्न आहेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार या प्रकल्पाकरिता प्राधान्याने निधीची तरतूद करणार आहेत.