ऐनारीतील महिलेला ‘स्वाईन फ्लू’-: ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू; प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 03:01 PM2019-04-16T15:01:35+5:302019-04-16T15:03:05+5:30
वैभववाडी तालुक्यातील नावळेच्या महिलेचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ऐनारी येथील सुनीता सीताराम सुर्वे (४५) या महिलेला ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भुईबावडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील नावळेच्या महिलेचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ऐनारी येथील सुनीता सीताराम सुर्वे (४५) या महिलेला ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भुईबावडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात(सीपीआर) उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे
ऐनारी गावठण येथील सुनीता सुर्वे यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी ताप, खोकला, उलटी सुरू झाल्याने त्यांना भुईबावडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथील उपचारांनी प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने त्यांना वैभववाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैभववाडीतील डॉक्टरांनी सुनीता सुर्वे यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कोल्हापुरातील ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात नावळेतील रोहिणी सावंत या महिलेचा ‘स्वाईन फ्लू’ने बळी गेला असतानाच ‘स्वाईन फ्लू’चा दुसरा रुग्ण ऐनारीत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ‘स्वाईन फ्लू’ हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोणते पाऊल उचलते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.