आजगाव येथे वडिलोपार्जित जमीन, राऊतांकडून माझी नाहक बदनामी; दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
By अनंत खं.जाधव | Published: July 16, 2024 02:58 PM2024-07-16T14:58:35+5:302024-07-16T14:59:27+5:30
सावंतवाडी : आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा ...
सावंतवाडी : आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा जमीन जात नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी माझी नाहक बदनामी करू नये. मी त्या ठिकाणी प्रकल्प आणला माझी जमीन दिली हे सिध्द करावे, अन्यथा आत्मक्लेश करून घ्यावा, असे प्रतिआव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते मंगळवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिकांना प्रकल्प नको असेल तर तो केला जाणार नाही. मी ग्रामस्थांसोबत आहे, अशी भूमिकाही घेतली.
उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दोन दिवसापूर्वीच केसरकर कुटुंबियांची आजगाव येथील मायनिंग क्षेत्रात जमिन असल्याचा आरोप केला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आजगाव येथे होणार्या मायनिंग प्रकल्पाबाबत आपल्याला माहित नाही. तेथील स्थानिक लोकांना प्रकल्प नको असतील तर तेथे प्रकल्प होणार नाही. लवकरच याबाबत मी त्यांची भेट घेणार आहे. मात्र त्या ठिकाणी असलेली आमची जागा ही वडिलोपार्जित आहे. विषेश म्हणजे त्या ठिकाणी असलेली एक एकर जमीन सुध्दा मायनिंग मध्ये जात नाही अशा परिस्थिती मीच प्रकल्प आणला, असा राऊत यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.
एक तर त्यांनी तो आरोप सिध्द करावा, अन्यथा आपण माझी बदनामी केली म्हणून आत्मक्लेश करावा, असे प्रतिआव्हान त्यांनी राऊतांना यांना दिले. राऊत यांच्यासह उध्दव सेनेची आरोप करण्याची सवयच असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बबन साळगावकर यांनी एसटी प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर ते आंदोलन करायची भाषा करीत असतील तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र बसस्थानक परिसरात सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. यापुर्वी सुध्दा मी स्वखर्चातून सिमेंटीकरण केले होते. त्यामुळे त्यांच्या टीकेवर मी काय बोलणार? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच सावंतवाडी मतदारसंघातील बरेच प्रश्न सुटल्याचे केसरकर म्हणाले.