...तर विजयदुर्ग जगातील सुंदर बंदर बनेल
By admin | Published: August 29, 2014 10:55 PM2014-08-29T22:55:38+5:302014-08-29T23:09:06+5:30
दिवाकर प्रसाद : विजयदुर्ग येथे सागरी विकास परिषद
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला परिसरातील समुद्र आणि खाडी याचा अभ्यास करून आरमाराच्या दृष्टीकोनातून या किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले होते. विजयदुर्गची भौगोलिक परिस्थिती अभ्यासली असता या परिसरात ग्रीनफिल्ड पोर्ट ते अल्टिमेंट हार्बर पोर्ट अशी चार प्रकारची बंदरे बांधणे शक्य आहे. विजयदुर्ग खाडीतील गाळ काढल्यास मुंबई न्हावाशेवापेक्षा १५ पट अधिक क्षमतेचा तसेच जगातील सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर उभे राहू शकेल. किंबहुना या विजयदुर्ग बंदरामुळे भारतातील दुसरी मुंबई वसवण्याची क्षमता आहे, असे मत मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी दिवाकर प्रसाद यांनी व्यक्त केले.
सिंधुभूमी फाऊंडेशन व कोकण क्लबच्यावतीने विजयदुर्गमधील एमटीडीसीच्या सभागृहात नुकतीच सागरी विकास परिषद झाली. यात कोकण व्हिजन २०१५ अंतर्गत कोकणातील बंदरांचा विकास व जलवाहतूक या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी विजयदुर्ग बंदराचा विकास करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने नियुक्त केलेले अधिकारी दिवाकर प्रसाद यांच्यासह गुजरात राज्यातील बंदरांचा प्रतिकूल परिस्थितीत विकास करणारे मालवणचे कॅ. यतीन देऊलकर, काताळे- रत्नागिरी येथील खासगी बंदराचे संस्थापक कॅ. दिलीप भाटकर या तज्ज्ञांसह आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.
मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांचा अभ्यास करण्यासाठी १९९८ मध्ये प्रमुख अधिकारी म्हणून दिवाकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जयगडसह विजयदुर्ग आणि रेडी बंदरांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीनफिल्ड पोर्टसाठी आवश्यक १६ मीटर खोली विजयदुर्ग बंदरासाठी उपलब्ध आहे.
कॅ. भाटकर यांनी कोकणामध्ये १९६८ मध्ये कोकण सेवक प्रवासी बोट वाहतूक सुरू केली. याचा अर्थ कोकणातील बंदरे पूर्वीपासून प्रवासी बोट वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत. मात्र, मधल्या काळात ही बोट सेवा बंद पडली. राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पुन्हा सुरू झाली नाही. मात्र विजयदुर्ग बंदराचा विकास झाल्यास तसेच अन्य बंदरातील गाळ काढला गेल्यास कोकणामध्ये पुन्हा सागरी जलवाहतूक सुरू होणे शक्य आहे. कॅ. इंद्रजीत सावंत यांनी, रस्ते, रेल्वे, विमान माल वाहतुकीच्या तुलनेने जल माल वाहतूक अत्यंत किफायतशीर असते. जागतिक आयात-निर्यातीमध्ये ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ६७ वर्षे झाली. देशाला तीन बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे. तरीही जलवाहतुकीचा वाटा केवळ १२ टक्केच एवढा राहिला आहे. आजवर कोकणातील अनेक बंदरे विकसीत करण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)
बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्के
जागतिक दर्जाची अल्टिमेट हार्बर जेटी उभारण्यासाठी २५ मीटर खोलीची गरज असते. विजयदुर्ग खाडीचा गाळ काढल्यास एवढी खोली मिळणे सहज शक्य आहे. कोकणासह राज्यातील खासदारांनी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जोर लावला तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे विजयदुर्गसह सिंधुदुर्ग आणि लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात दुसरे मुंबई शहर वसवणे हे वास्तववादी स्वप्न ठरेल. याशिवाय अन्य तीन प्रकारची छोटी बंदरे विजयदुर्ग परिसरात उभारणे शक्य आहे. या चारही बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्क्यांच्या दरम्यान राहील.