संप काळातील अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्याप्रकरणी कुडाळात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 09:30 PM2017-11-06T21:30:55+5:302017-11-06T21:34:15+5:30
संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल असंतोष पसरविण्याचा ठेका घेतल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा महिला बालकल्याण विभागावर अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या सचिव कमल परूळेकर यांनी केला.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल असंतोष पसरविण्याचा ठेका घेतल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा महिला बालकल्याण विभागावर अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या सचिव कमल परूळेकर यांनी केला. नोकरी वरून काढून टाकण्या संदर्भात दिलेल्या नोटीसांच्या विरोधात संघटनेच्या वतीने कुडाळ पंचायत समितीवर काढलेल्या मोर्चा प्रसंगी बोलताना केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
सोमवारी दुपारी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घोषणा देऊन पंचायत समितीचा परिसर दणाणुन सोडला. या मोर्च्यावेळी कमलताई परूळेकर व काही अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीचे सभापती राजन जाधव व गटविस्तार अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी परूळेकर यांनी सांगितले की, आपल्या न्याय मागण्या व हक्क मिळविण्यासाठी संपुर्ण राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संप फुकारला होता. आता हा संप मिटला असून अंगणवाडी सेविका व मदतनीस या कामावर देखिल रूजु झाल्या आहेत. असे असताना केवळ याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाने संपकर्त्यांच्या कामावरून कमी करण्याच्या अंतिम नोटीसा बजावुन दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत.
तसेच परूळेकर यांनी सांगितले की, दोन नोटीसा बजावल्यानंतर आता कुडाळ महिला बालकल्याण विभागाने १० वर्षांपुर्वीच्या शासन निर्णयाचा वापर करून चुकीच्या पध्दतीने कमावरून कमी करण्याची अंतिम नोटीसा या तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना अशा नोटीस कशा काय बजावता येतील असे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आता आम्ही निवेदन नाही तर नोटीसांच्या विरोधात खुलासा आणला असुन जो पर्यंत सर्व खुलाशांवर पोहोच मिळत नाही तो पर्यंत आम्ही येथुन हलणार नाही असा ही इशारा परूळेकर यांनी दिला. त्यांनी सांगितले की, संप काळात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पत्रावर जावक क्रमांक नसलेली नोटीस राज्यातील इतर जिल्ह्यात प्रसिध्द केली जाते. आयओएस मानांकित जिल्हा परिषदेमध्ये असे कारभार चालतात का? असा ही प्रश्न त्यांनी उपस्थित करीत प्रशासनाच्या या कारभाराच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
यावेळी गटविस्तार अधिकारी विजय चव्हाण यांनी महीला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांच्या लेखी खुलाशावर पोहोच देवुन त्यांचे म्हणणे वरीष्ठापर्यंत पोहचवा अशी सूचना केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातच बजावल्या नोटीसा.- कमलताई परूळेकर
संपूर्ण राज्यभर संप सुरू होता. मात्र राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात अशा प्रकारे संपकर्त्या अंगणवाडी सेविकांना नोटीसा कोणीही बजावल्या नाहीत. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच प्रशासनाने अशा प्रकारे कशा काय नोटीसा बजावल्या? संप करणे म्हणजे गुन्हा आहे का? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पगार मिळत नाही त्यासाठी काय करता? - कमलताई परूळेकर
महिला बाल कल्याण विभागाला फक्त नोटीसा काढायचे कळते मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार, पोषण आहाराची बिले सहा सहा महीने मिळत नाहीत. त्यासाठी या विभागाच्यावतीने काय केले जाते असा ही सवाल परूळेकर यांनी उपस्थित केला.
वरीष्ठांच्या निर्णयानुसार बजावल्या नोटीसा- अधिकारी
यावेळी अधिकाऱ्यांनी अगोदर पाठविलेल्या पत्रांचे उत्तर न दिल्यामुळे अंतिम नोटीसा देण्यात आली. अतिरिक्त मुख्यकार्यकारी यांच्या सभेतील निर्णयानुसार हा निर्णय घेतला आहे असा खुलासा केला.