अंगणवाडीच नवीन पिढीचा खरा पाया

By admin | Published: March 30, 2015 10:43 PM2015-03-30T22:43:24+5:302015-03-31T00:20:19+5:30

संदेश सावंत : आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार वितरण

Anganwadi is the true foundation of a new generation | अंगणवाडीच नवीन पिढीचा खरा पाया

अंगणवाडीच नवीन पिढीचा खरा पाया

Next

सिंधुदुर्गनगरी : समाजातील नवीन पिढीचा पाया रचण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. अंगणवाडीच नवीन पिढीचा पाया आहे. भावी पिढीचे भवितव्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण जबाबदारीने पार पाडण्याचे महान कार्य आपल्या हातून घडत आहे, हे आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ््यात बोलताना केले.
जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार २०१३-१४चा वितरण सोहळा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती स्नेहलता चोरगे, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रूक्मिणी कांदळगावकर, श्रावणी नाईक, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी गुणवत्तेसह विविध प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालवण तालुक्यातील वराड हडपीडवाडी येथील नम्रता नाना परब यांना राज्यस्तरीय पुरस्कारासह रोख ५ हजार रूपयाचे बचतपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षकांना यावर्षीपासून प्रथमच पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कणकवली तालुक्यातील वरवडे प्रभागातील सुप्रिया जनार्दन पुजारे, कळसुली प्रभागातील मधुरा मनोहर मांजरेकर, तर वेंगुर्ले तालुक्यातील माधुरी गुरूनाथ मेस्त्री यांना ३ हजार रूपयांचे जिल्हास्तरीय पुरस्कार संदेश सावंत यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील ४८ प्रभागातील ४८ अंगणवाडी सेविका, ४८ मदतनीस अशा ९६ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचतगट, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संदेश सावंत म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती समाजाची नवीन पिढी घडविण्याचे महान कार्य आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी हे काम प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. त्यातही आदर्श असे काम करणाऱ्यांचा आज गौरव झाला. या कामात सर्वांनी सातत्य राखावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)


अंगणवाडी कर्मचारी प्रत्येक लहान मुलाला आईचे प्रेम देऊन चांगल्या सवयी लावतात. त्यामुळेच पालक आपल्या मुलांना त्यांच्या स्वाधीन करून बिनधास्त राहतात. मनात कोणतीही स्वार्थी भावना न बाळगता भावी पिढीला चांगले संस्कार देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अल्प मानधनात समाजसेवा करण्याचे काम घडत आहे. हे कोणत्याही कामापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे, त्यामध्ये सातत्य ठेवा.
- दिलीप पांढरपट्टे,
मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title: Anganwadi is the true foundation of a new generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.