पाऊले चालती आंगणेवाडीची वाट
By Admin | Published: February 6, 2015 11:55 PM2015-02-06T23:55:16+5:302015-02-07T00:06:46+5:30
प्रशासन सज्ज : आजपासून भराडीदेवीचा यात्रोत्सव; मुंबईसह राज्यातील भाविक दाखल
चौके : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडीदेवीचा यात्रोत्सव उद्या (शनिवार)पासून सुरू होत आहे. कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली असून, ‘पाऊले चालती... आंगणेवाडीची वाट.. अशीच स्थिती आहे. दरम्यान, यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, आंगणे कुटुंबीय यांनी सुयोग्य नियोजन केले आहे. यावर्षी आकर्षक विद्युतरोषणाई व फुलांची मोहक आरास भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. यावेळी गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आंगणेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात आणि गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ४८ अधिकारी व ६२५ पोलीस कर्मचारी आंगणेवाडीत बंदोबस्त बजावणार आहेत. मंदिर परिसरातील रांग व्यवस्था, पेट्रोलिंग, वाहतूक नियंत्रण, वॉच टॉवर अशा माध्यमातून कर्मचारी मेहनत घेणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांपैकी २२५ कर्मचारी रत्नागिरी, रायगड येथून दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन
उद्या (शनिवार) पहाटे तीन वाजता दर्शनाला सुरुवात होईल. ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन रांगा असणार आहेत. त्यानंतर १0 ते १२ या वेळेत महाप्रसाद आणि ताटे लावण्याचा कार्यक्रम असेल. पुन्हा रात्री १२ नंतर रविवारी सायंकाळपर्यंत दर्शन भाविकांसाठी खुले राहणार आहे. शिस्त व संयमाने दर्शन घेऊन यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नरेश आंगणे यांनी केले आहे.
सात रांगेत दर्शन
आंगणेवाडी यात्रोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सुमारे १५ लाख भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन दर्शनासाठी सात रांगा तयार करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या भाविकांना त्वरित दर्शन मिळण्यासाठी नियोजन केले आहे.
हेलीपॅडची व्यवस्था
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भराडी देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपींची गर्दी लक्षात घेऊन दोन हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.
महनीय व्यक्तींचे जिल्हा प्रशासन आणि आंगणेवाडी कुटुंबीयांच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे.