आंगणेवाडी यात्रोत्सवाची लगबग सुरू
By Admin | Published: February 3, 2015 09:43 PM2015-02-03T21:43:30+5:302015-02-03T23:55:03+5:30
शेवटचे दोन दिवस : रांग व्यवस्था, मंडप उभारणीला वेग
चौके : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा वार्षिक यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शनिवार ७ फेब्रुवारीपासून या यात्रोत्सवाला सुरूवात होणार असून रविवारी सायंकाळी यात्रोत्सवाची समाप्ती होणार आहे. त्यामुळे आंगणे कुटुंबीय, यात्रा नियोजन समिती आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांची यात्रा व्यवस्थापनासाठी लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सात रांगांमधून देवीचे दर्शन व ओट्या भरण्यास मिळणार आहेत. त्यासाठी मंदिर परिसरातील मंडप उभारणी, रांगांसाठीचे पूल, आंगणे कुटुंबीयांची कंट्रोल केबीन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यावर्षी अंदाजे १२ लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज आंगणे कुटुंबीयांतर्फे नरेश आंगणे व मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंगणेवाडीतील तरूण मंडळी आणि इतर सर्वजण व्यवस्थापन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. भाविकांना लवकरात लवकर भराडी मातेचे दर्शन मिळाल्याबाबत आंगणे कुटुंबीयांनी नियोजन केले आहे. दर्शन रांगांमध्ये भाविकांना त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. दर्शन रांगेतून मंदिरामध्ये येणारा आडवा पूल मंदिरापासून मागे घेण्यात आला असून मंदिराचे सौंदर्य वाढेल याची दक्षता घेण्यात येत आहे. यात चार मोठे व चार लहान अशा एकूण आठ मंडपांची उभारणी होणार आहे.
भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराभोवती हिरवे कार्पेट पसरविण्यात येणार आहे. यावर्षी मंदिराच्या गाभाऱ्यातील, मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास खास आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे मंदिराशेजारी मुख्य व्यासपीठावर आंगणे कुटुंबीयांची कंट्रोल केबीन असणार आहे. रस्त्यानजिक महसूल व पोलीस प्रशासनाची अद्ययावत कंट्रोल केबीन असणार आहे. या ठिकाणांहून यात्रेकरू भाविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आंगणेवाडी यात्रोत्सवात हॉटेल्स, खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने यांसारखी शेकडो दुकाने थाटली जातात. त्या दुकानदारांनीही आपली दुकाने उभारण्यास सुरूवात केली आहे. मसुरे ग्रामपंचायतीने यात्रोत्सवातील पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देऊन पाणी शुद्धीकरण मोहिम पूर्ण केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते डागडुजी आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. (वार्ताहर)