सिंधुदुर्ग:..अन् संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे; मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांना आत कोंडले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 29, 2022 11:37 AM2022-09-29T11:37:39+5:302022-09-29T11:49:47+5:30
शिक्षक नेमण्यासाठी वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालक संतप्त
मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हेदूळ शाळेत शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत शाळेला टाळे ठोकले. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांनाही कोंडून ठेवत ग्रामस्थांनी काल, बुधवारी हे आंदोलन छेडले.
हेदूळ शाळेतील एक शिक्षक गेले तीन महिने रजेवर गेले आहेत. त्याजागी शिक्षक नेमण्यासाठी वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेवर धडक देऊन विद्यार्थ्यांना बाहेर आणून शाळेला टाळे ठोकले. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांनाही कोंडून ठेवत आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा पवित्रा पालकांनी घेतला.
याबाबत माहिती मिळताच मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी शाळेत धाव घेत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून दिला. त्यानंतर सहा तासांनी पालकांनी शाळेचे कुलुप काढत आंदोलन मागे घेतले.