संतप्त प्रवाशांनी ‘गणपती स्पेशल’ अर्धातास रोखली; वैभववाडी रेल्वेस्थानकातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:11 PM2024-09-16T12:11:12+5:302024-09-16T12:11:21+5:30
वातानुकूलित बोगीत होता बिघाड; कणकवली स्थानकावरही रेल्वे अधिकारी धारेवर
वैभववाडी : मडगावहून पनवेलला जाणाऱ्या ‘गणपती स्पेशल’ गाडीच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी वैभववाडी रेल्वेस्थानकात गाडी रोखून धरली. यावेळी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जतही घातली. तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर गाडी रत्नागिरीकडे मार्गस्थ करण्यात आली. या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेमार्गावर गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. सर्वच गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी आहे. रविवारी सकाळी मडगाव ते पनवेल ही गणपती स्पेशल मडगावहून निघाली. परंतु, या गाडीतील वातानुकूलित डब्यांतील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्याबाबत त्या डब्यातील प्रवाशांनी गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना कल्पना दिली. याशिवाय ऑनलाइन तक्रारीही केल्या. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळात वातानुकूलित सेवा सुरू होईल, असे सांगितले.
परंतु, बराचवेळ होऊन गेला, तरी परिस्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे प्रवासी अक्षरश: वैतागून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुरुवातीला कणकवली स्थानकात काही काळ ही गाडी थांबवून वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती करण्याची विनंती केली. त्या ठिकाणीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवाशांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे काही काळ येथे मोठा गोंधळही निर्माण झाला होता.
रेल्वे प्रशासनाकडून वातानुकूलित यंत्रणा थोड्याच वेळात सुरू होईल, असे आश्वासन प्रवाशांना देण्यात आले. मात्र ,परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रवाशांनी पुन्हा वैभववाडी स्थानकात आल्यावर गाडी अर्धा तास रोखून धरली. यावेळी प्रवासी चांगलेच संतापले होते. त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. अखेर येथील स्टेशन मास्तर यांनी प्रवाशांची तक्रार लेखी स्वरूपात घेतली. तसेच, तात्पुरती दुरुस्ती करून रत्नागिरीमध्ये डब्यातील वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली.
तीव्र नापसंती
कोकण रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, या प्रकारामुळे अनेक प्रवासी हैराण झाले होते. वातानुकूलित बंद असल्याने या डब्याचे दरवाजे उघडून ठेवण्याची वेळ रेल्वेच्या प्रवाशांवर आल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली गेली.