नाराज सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर ?

By admin | Published: September 30, 2016 11:43 PM2016-09-30T23:43:29+5:302016-10-01T00:19:12+5:30

समीकरणे बदलली : जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथ होणार?

Angry Suryakant Dalvi BJP on the way? | नाराज सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर ?

नाराज सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर ?

Next

दापोली : केंद्रीयमंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाले असले तरी शिवसेनेतील अन्य अंतर्गत कलह अजून संपलेले नाहीत. त्यातच दापोलीच्या उमेदवारीसाठी योगेश कदम यांचे नाव पुढे येण्याची शक्यता बळावल्याने नाराज असलेले शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.
दापोलीच्या राजकारणात गेली २५ वर्षे सूर्यकांत दळवी आमदार होते. मात्र, गेल्यावेळी पक्षातील गद्दारांमुळेच आपला पराभव झाल्याचे दळवी यांनी वारंवार उघडपणे बोलून दाखवले होते. परंतु त्यांचा पराभव करणाऱ्या गद्दारांना पक्षातून हाकलणे त्यांना शक्य झाले नसल्याचेही बोलले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य भगवान घाडगे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे, माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास कदम, अनिल पवार, माजी उपनगराध्यक्ष भाऊ तांबे आदींसह काहींवर प्रत्यक्ष, तर अनेकजणांवर दळवी यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. जिल्हा परिषद केळशी आणि पालगड गटातून मताधिक्य घटल्याचा उल्लेख त्यांनी वारंवार केला होता. या गद्दारांनी पक्षाविरोधात काम केले, त्यांना आधी हाकला, अशी मागणी दळवी वारंवार करत होते. त्यांना हाकलणे सोडाच; त्याउलट त्यांच्याकडेच महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. ज्यांच्यामुळे पराभव झाला त्या गद्दारांना पक्षात सन्मानाने पदे मिळणार असतील तर आमची किंमत काय? म्हणून दळवी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत खेड मतदारसंघातून मताधिक्य घटल्याने दळवी यांनी रामदास कदम यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. दापोलीच्या राजकारणापासून रामदास कदम यांना दूरच ठेवण्यात आल्याचे पक्षात त्यावेळी बोलले जात होते. निवडणुकीत गद्दारी करणारी मंडळी रामदास कदम यांच्या आश्रयाला होती. कदम व गीते गटांमुळेच पराभव झाल्याचे त्यावेळी राजकीय चर्चेतून समोर येत होते.
विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवून दळवी पुन्हा भगवा फडकवायला निघाले होते. मतदारसंघात त्यांनी मावळ्यांची पुन्हा जुळवाजुळव सुरु केल्याचे बोलले जात होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष आपल्याला तिकीट देईल, हीच अपेक्षा बाळगून ते कदाचित पुन्हा जोमाने कामाला लागले असावेत. परंतु निवडणुकीनंतर काही महिन्यात रामदास कदम यांना पर्यावरणमंत्री पद मिळाले व दापोलीचे दौरे सुरु झाले. दळवी व कदम यांचे फारसे सख्य नव्हते. तरीही दोघांनी हातमिळवणी करुन एका व्यासपीठावर यायला सुरुवात केली होती. परंतु कदम यांनी योगेश कदम यांचे ‘लॉचिंग’ सुरु केल्याने दळवी दुखावले गेल्याचे बोलले जात होते. रामदास कदम यांचा राजकीय वारसदार म्हणून योगेश कदम यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा, निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्या घाडगे, फणसे, सुर्वे यांना जवळ करून रामदास कदम यांनी पक्षात सन्मानाची पदे देण्याच्या हालचाली सुरु केल्यानेच दळवी दुखावल्याची चर्चा आहे.
दापोलीच्या राजकारणात २५ वर्षे एकहाती शिवसेनेची सत्ता टिकवणाऱ्या दळवींचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी भाजप संधीच्या शोधात आहे. त्यामुळे दळवींसारखा बडा नेता गळाला लागला, तर भाजपचा फायदा होऊ शकतो. या विचाराने कदाचित त्यांना भाजपत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत दळवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असे झाल्यास सेना चांगलीच अडचणीत येईल, असे बोलले जात आहे.(प्रतिनिधी)


विधानसभा गेल्या निवडणुकीत अंतर्गत वादामुळे सूर्यकांत दळवी यांना फटका बसला होता. त्यामुळे दळवी नाराज आहेत. आता अनंत गीते आणि रामदास कदम यांचे मनोमीलन झाले असतानाच सूर्यकांत दळवी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली असून, या मनोमीलनानंतर त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले. सूर्यकांत दळवी यांनी सेना सोडली तर अनेकजण त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.
गीते - कदम मनोमीलनानंतर पक्षातील कार्यकर्त्यांना संघटित करण्याच्या हालचाली सुरु असून, दोघांच्या दुराव्यानंतर पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: Angry Suryakant Dalvi BJP on the way?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.