अंकिताला पेलायचीय ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धा
By Admin | Published: January 3, 2016 11:41 PM2016-01-03T23:41:53+5:302016-01-04T00:45:01+5:30
यश रत्नकन्यांचे
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी -घरातील कोणीही खेळात नाही. परंतु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना क्रीडा प्रशिक्षक मदन भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर व प्रा. मदन भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी झाले. महाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढला. कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेकरिता निवड झाली होती. मात्र, संपूर्ण भारतीय टीमचा व्हिसा नाकारल्याने ही संधी हुकली. परंतु कॉमनवेल्थमध्ये खेळण्याची इच्छा आहे. खेळ सुरूच ठेवणार असून, भविष्यात शासकीय नोकरीत वर्ग-१चा अधिकारी बनण्याची मनीषा अंकिता मयेकर हिने बाळगली आहे.
रत्नागिरी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बसणी गावातील अंकिता मयेकर हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बसणीतच झाले. अकरावी व बारावी कला शाखेतून अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर प्रथम वर्ष बी. ए.साठी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिकत असताना मैत्रिणींसमवेत मीही पॉवरलिफ्टिंगसाठी सराव सुरू केला. स्पर्धेसाठी लागणाऱ्या विविध टीप्स, सूचना यांचे वेळोवेळी मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक मदन भास्करे यांनी केले. वडील जिल्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी. अंकिता व तिला छोटा भाऊ मिळून चौकोनी कुटुंब. वडिलांच्या पगारात घरखर्च, तसेच स्पर्धेला बाहेर जाण्याचा सर्व खर्च परवडणारा नव्हता. त्यावेळी महाविद्यालयाने तिला खूप मदत केली. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनीही तिला प्रोत्साहन दिले. खेळातील स्पार्क ओळखून तिला वेळोवेळी स्पर्धेकरिता सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले. आई-बाबांनीही तिला पाठिंबा दिल्यामुळेच मिळालेल्या संधीचा मनापासून स्व्ीाकार करून कष्टाने आजपर्यंत विविध स्पर्धांमधून ५०पेक्षा अधिक सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवली आहेत.
यावर्षी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक, राष्ट्रीय डेडलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रीय डेडलिफ्टिंग स्पर्धेत इंडियन स्ट्राँग वुमन किताब देऊन तिला गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय हाँगकाँग येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंगच्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवित भारताला दुसऱ्या क्रमांकाचा विजय मिळवून दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक फिलिपाईन्स तर तृतीय क्रमांक कझागिस्तान या देशाने मिळवला.
खेळ सुरू ठेवण्याची इच्छा असल्यामुळेच अंकिताचा दिनक्रम पहाटेपासून सुरू होतो. रत्नागिरीत सकाळी येऊन गोगटे कॉलेजच्या जीमखान्यामध्ये दररोज एक तास न चुकता सराव, तर सायंकाळी एका खासगी जीममध्ये सलग दोन तास सराव सुरू असतो. स्पर्धेच्या कालावधीत सुटीच्या दिवशीही हा सराव सुरू असतो. मधल्या वेळेत दिवसभर कार्यालयीन कामकाज करून घरी पोहोचेपर्यंत रात्र होते. महसूल विभागाच्या होणाऱ्या विभागीय स्पर्धेत ती दरवर्षी सहभागी होते. आतापर्यंत रनिंग, थ्रोबॉल सारख्या स्पर्धेतून १५पेक्षा अधिक विविध पदके मिळवली आहेत. खेळाची आवड आपण भविष्यातही जपणार असल्याचे अंकिता हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अंकिताने एम. ए.पर्यत शिक्षण पूर्ण केले असून, सध्या ती जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात नोकरी करीत आहे. परंतु हाँगकाँगला जाण्यासाठी दीड लाखाचा खर्च अपेक्षित होता. वडिलांना तसेच तिला हा संपूर्ण खर्च शक्य नव्हता. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालय तिच्या मदतीला धावून आले. तिच्या स्पर्धेला जाण्या-येण्याचा सर्व खर्च जिल्हाधिकारी कार्यालयाने केला. हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे अंकिताने स्पष्ट केले.
एशियन स्पर्धेसाठी भारताच्या ३५ जणांच्या टीममध्ये माझी निवड झाली. महाराष्ट्रातील चार खेळाडूंमध्ये माझा समावेश होता. भारताच्या संघातून अंकिताने कोकणाचे प्रतिनिधीत्व केले. हाँगकाँगला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलो त्यावेळी माझे नाव टीममध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु विमानतळावरील यादीनुसार माझे नाव चौथ्या क्रमांकावर आले. त्यावेळी झालेली धावपळ व गडबडीत आणि टेन्शनमध्ये विमानात पहिल्यांदा बसतानाची मजा मात्र मी मिस् केल्याचे अंकिताने सांगितले.
कॅनडा येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीही माझी निवड झाली होती. एकूण ६७ जणांची टीम होती. महाराष्ट्राच्या संघातून माझी निवड झाली होती. परंतु अचानक व्हिसा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ जाऊ शकला नाही, त्यामुळे ही संधी हुकली. परंतु भविष्यात कॉमनवेल्थ खेळण्याची इच्छा आहे. भविष्यात खेळ सुरूच ठेवण्याची जिद्द आहे.