सावंतवाडीत १७ जानेवारीपासून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
By admin | Published: December 14, 2014 08:12 PM2014-12-14T20:12:05+5:302014-12-14T23:51:00+5:30
गोविंद पानसरे : वैचारिक बंड नेहमी साहित्य निर्माण करते
सावंतवाडी : वैचारिक बंड हे नेहमी साहित्य निर्माण करीत असते. त्यामुळेच आम्ही विविध विषयांवर विचार मांडण्यासाठी हे साहित्य संमेलन आयोजित करीत असून या साहित्याचा लाभ सर्वत्र व्हावा, अशी अपेक्षा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली.
सावंतवाडीत १७ जानेवारीपासून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील श्रीराम वाचन मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिहर आठलेकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. गोविंद काजरेकर, अॅड. संदीप निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी पानसरे म्हणाले, आतापर्यंत राज्यात सहा ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सावंतवाडीत होणारे हे सहावे साहित्य संमेलन असून, या संमेलनात जास्तीत जास्त साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत. अण्णा भाऊ हे श्रमिक कष्टकरी व तळागाळातील लोकांच्या वेदना मांडणारे चतुरस्त्र साहित्यिक होते. त्यामुळे या व्यासपीठावरून अनेक वैचारिक परिसंवाद होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे संमेलन १७ व १८ जानेवरीला येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन ग्रंथदिंडीने होणार आहे. तसेच यावेळी गं्रथस्टॉल उभारले जाणार आहेत, तर संमेलनाचे अध्यक्षपद सतीश काळसेकर हे भूषविणार आहेत. उद्घाटन सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर असून, डॉ. राजन गवस, पत्रकार किरण ठाकूर, माजी आमदार जयानंद मठकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, आनंद मेणसे उपस्थित राहणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या दिवशी परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, यामध्ये मोठमोठ्या वक्त्यांना बोलवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीत ४०० ते ५०० साहित्यिक येणार असल्याचेही पानसरे यांनी स्पष्ट केले. तसेच या साहित्य संमेलनातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)