कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ग्रामस्थांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 08:57 AM2017-12-01T08:57:27+5:302017-12-01T09:51:42+5:30
या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.
सिंधुदुर्ग - नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडी (मसुरे, मालवण) येथील श्री भराडी देवीच्या २०१८ वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. यावर्षी २६ जानेवारीची सुट्टी आणि २७ ला शनिवार, २८ ला रविवार असल्याने यात्रोत्सवाला तुफान गर्दी होणार आहे.
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. शुक्रवारी (१ डिसेंबर) सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे.
या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात. देविला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात. यात्रोत्सव दीड दिवस चालतो. मंत्रिमहोदयही उपस्थित असतात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपारिक पद्धतीने तारीख ठरवितात.
दरवर्षी किमान १० लाख भाविक दोन दिवसात दर्शनासाठी येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक मिळून १५०० कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या किमान ५ ते ६ बैठका होतात.