रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:50 PM2020-02-18T12:50:07+5:302020-02-18T12:55:00+5:30
हाती घेतलेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ओरोसः सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेची उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. पण या योजनेत नक्की आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गातील ओरोस येथे पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. एलईडी मासेमारी विरोधात कडक कायदा करणार आहे. कोस्टगार्ड, पोलीस यांना एकत्र गस्त घालण्याचा सूचना दिलेल्या आहेत. तसेच हाती घेतलेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
निधी वितरण करताना अशा अपूर्ण प्रकल्पांबाबत प्राधान्यक्रम ठरवून तो वितरित केला जाईल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा बैठकांचे आयोजन केले जाते, यामधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसापासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पसंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण तापले होते. यावरून शिवसेनेने सत्तेत आल्यावर आपली नाणार प्रकल्पासंदर्भात भूमिका बदलल्याची चर्चा होत होती. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच भाष्य केले आहे. याआधी सुद्धा नाणार प्रकल्पाला शिवसेनेचे विरोध होता आणि यापुढे सुद्धा राहणार, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे.
शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी सामानातील नाणार प्रकल्पातील जाहिरातीविषयी पत्रकाराने प्रश्न विचारला असता, सामनामध्ये बद्धकोष्ठाची देखील जाहिरात येते, असे उत्तर ठाकरेंनी दिले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे सर्व निर्णय मी घेतो. कोणतीही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदललेली नाही. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा आजही विरोध आहे आणि पुढेसुद्धा राहणार, असे परखड मत उद्धव ठाकरेंनी मांडले.
एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव-भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोकणातील आढावा बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा विषय कोरेगाव भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणार नाही.
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री
कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव-भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपाकरून कोणीही गैरसमज करून घेऊ नका, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.