सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर
By admin | Published: January 29, 2016 11:03 PM2016-01-29T23:03:00+5:302016-01-29T23:54:02+5:30
अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली : ओरोस, अणाव, रानबांबुळी या तीन गावांचा समावेश
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी-ओरोस नगरपंचायत स्थापनेची प्रारुप अधिसूचना अखेर शासनाने जाहीर केली आहे. ओरोस, अणाव व रानबांबुळी या तीन गावांची मिळून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होणार असल्याने सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचा मार्ग अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोकळा झाला आहे. नगरपंचायत स्थापनेच्या अधिसूचनेची माहिती ओरोस सरपंच मंगला ओरोसकर व जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओरोस, अणाव व रानबांबुळी या तीन गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची निर्मिती केली व त्याठिकाणी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्वात आले. परंतु, गेल्या २५ वर्षांत या नगरीचा अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. प्राधिकरणकडे स्वतंत्र निधी किंवा स्वतंत्र कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास होण्यासाठी नगरपंचायत स्थापनेची मागणी सिंधुदुर्गनगरीवासीयांकडून होऊ लागली.
नगरपंचायतीच्या मागणीचा प्रस्ताव २८ जून २००७ रोजी शासनाला पाठविण्यात आला होता. पहिला प्रस्ताव गहाळ नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरले
ओरोस-सिंधुदुर्गनगरीच्या नावाने आता मुख्यालय, ओरोस, अणाव व रानबांबुळी या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करणारी प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे ग्रामस्थांचे नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
हे मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या नगरपंचायतीला फार
महत्त्व आहे. यामुळे नगरपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच तयारी केली आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे.
नगरपंचायतीबाबत हरकती;
२५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
या नगरपंचायत स्थापनेबाबत कोणाला हरकती द्यावयाच्या असतील तर २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवायच्या आहेत. हरकती नसल्यास ओरोस, अणाव व रानबांबुळी या तिन्ही ग्रामपंचायतींसह सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण बरखास्त होऊन सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होणार आहे.