सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ अफवाच!, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: September 30, 2022 05:17 PM2022-09-30T17:17:27+5:302022-09-30T17:17:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख, काळा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे.
कणकवली : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींच्या भूमिका दोन महिन्यात कशा बदलल्या, हे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या नागरिकांना कळून चुकले आहे. शिवसेना आणि काँगेसचे सरकार असताना सत्ताधारी आमदार घोषणा करत होते. पण त्या अफवाच होत्या. तेव्हा विरोधात असलेल्यांनीही केलेल्या घोषणा याही अशाच अफवा होत्या अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
तर, याबाबत मनसे लोकांना जागरूक करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये कधी येणार आणि परदेशातल्या काळ्या पैशासोबत जनतेचा लुटलेला पांढरा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे असेही उपरकर म्हणाले. कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कोट्यावधी रुपयांच्या योजना मतदारसंघात आणल्याचे सांगितले. परंतु त्या योजना प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत. ३४ ते ३५ किलोमीटरची आठ कोटीची मातोश्री पांदण योजना मतदार संघात आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध बंधारे, विकास कामांच्या घोषणाही त्यांनी केल्या. परंतु त्या एकाही कामाचा शुभारंभ झाला नाही. मग अधिकाऱ्यांच्या विरोधात जाणे, त्यांना बोलणे ही भूमिका आता त्यांनी घेतली आहे.
..पण सर्वसामान्यांची कर्जमाफी करायला जमलं नाही
तर आता सत्तेत आलेले भाजपाचे आमदार नितेश राणे हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रिंटर देणार, संगणक देणार, रस्त्यांना निधी देणार अशा प्रकारच्या घोषणा करत आहेत. त्या तसेच पूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले? मुंबई – गोवा महामार्गाच्या दुर्दशेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मोठमोठ्या उद्योजकांना कर्जमाफी केली जात आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांना कर्जमाफी करायला केंद्र आणि राज्य सरकारला जमलेले नाही.
स्थानिकांवर अन्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करत असताना परप्रांतीयांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणत स्थानिकांवर अन्याय करत आहेत. मनसेने परप्रांतीच्या विरोधात पूर्वी पासूनच आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. जे परप्रांतीय पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव करत आहेत त्यांना आम्ही महाराष्ट्रीयन समजतो. मात्र एक ते दोन वर्षासाठी येणाऱ्या लोकांचा मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा देऊन जिल्ह्यातल्या कारागिरांच्या पोटावर पाय देण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे असे उपरकर म्हणाले.