कृष्णमूर्ती विसर्जनाची आगळी वेगळी पद्धत, कुठं अन् नेमकी काय आहे ही प्रथा? जाणून घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:33 PM2022-08-24T12:33:54+5:302022-08-24T12:46:41+5:30
कृष्ण आपल्याला ओलांडून गेला की तो आपले रक्षण करतो, अशी श्रद्धा इथल्या ग्रामस्थांमध्ये असल्याने आजही ही प्रथा तेवढ्याच भावनेने सुरू आहे.
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : कृष्ण विसर्जनावेळी मार्गात झोपून कृष्णाची स्वारी आपल्यावर ओलांडून घेण्याची प्रथा उभादांडा गावातील नवाबाग येथे सुरू आहे. या प्रथेला आज २०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ही प्रथा अजूनही त्याच श्रद्धेने पाळली जाते.
नवाबाग येथे तांडेल कुटुंबीयाकडे श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. पूजन झाल्यानंतर उपवास सोडला जातो. यावेळी उपवासाला मुगाचे लाडू वाटले जातात. आरती झाल्यावर सर्वांना फराळ दिला जातो.
पहाटेपर्यंत ग्रामस्थांची भजने सुरू असतात. पहाटे काकड आरती होते. त्यानंतर श्रीकृष्णाची पूजा झाल्यावर दुपारी महाप्रसाद होतो. सायंकाळी महिलांची फुगडी कार्यक्रम आणि त्यानंतर कृष्णाष्टमीचे आकर्षण असलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात होते.
दहीहंडी फोडण्याअगोदर कबड्डी, वाघ-शेळी, रस्सीखेच, उंच उडी आदी पारंपरिक खेळही खेळले जातात. दहीहंडी फोडल्यावर कृष्ण विसर्जनाची लगबग सुरू होते.
या विसर्जनाच्या मार्गात अबालवृद्ध आडवे झोपून घेतात. यानंतर विसर्जनाला निघालेला कृष्ण या अबालवृद्धांना ओलांडून समुद्रकिनारी जातो. कृष्ण आपल्याला ओलांडून गेला की तो आपले रक्षण करतो, अशी श्रद्धा इथल्या ग्रामस्थांमध्ये असल्याने आजही ही प्रथा तेवढ्याच भावनेने सुरू आहे.