विरोधानंतरही अजून एक सोशल क्लब सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:21 AM2021-04-05T11:21:58+5:302021-04-05T11:23:29+5:30
Crime News Sindhudurg-सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालत असल्याचा आरोप करीत वागदे ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी एका सोशल क्लबला केलेल्या विरोधानंतर आता पुन्हा एकदा वागदे गावामध्ये दुसरा सोशल क्लब सुरू करण्यात आला आहे.
कणकवली : सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालत असल्याचा आरोप करीत वागदे ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी एका सोशल क्लबला केलेल्या विरोधानंतर आता पुन्हा एकदा वागदे गावामध्ये दुसरा सोशल क्लब सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे एकाच गावात आता दोन सोशल क्लब चालू झाल्याने खेळणाऱ्यांची मात्र चंगळ होणार आहे. वागदेमधील पहिला सुरू झालेला सोशल क्लब हा जुगार अड्डा बनणार अशा स्वरूपाचे आरोप स्थानिक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केले होते.
तसेच याबाबत वागदेचे सरपंच पूजा घाडीगावकर यांनीही पोलीस व प्रशासनाकडे निवेदने देत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्या संदर्भात पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. असे असताना वागदेमध्ये दुसरा सोशल क्लब सुरू झाल्याने आता सोशल क्लबमधील खेळी वाढणार आहेत.
तरुण पिढी जुगाराच्या नादी लागण्याची भीती
वागदेत या क्लबच्या नावाखाली तरुण पिढी जुगाराच्या नादी लागण्याची भीती वागदे ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. विरोध होऊनदेखील एक नव्हे तर तब्बल दोन सोशल क्लब एकाच गावात सुरू झाल्याने या क्लबमधील खेळणाऱ्यांसाठी मात्र ही एक पर्वणीच असणार आहे. ग्रामस्थ व वागदेतील लोकप्रतिनिधींचा विरोध झुगारून हे क्लब सुरू होत असल्याने यामागे नेमके कारण काय? असाही प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.