बांद्यात आणखी एक माकडताप ‘पॉझिटिव्ह’

By admin | Published: March 8, 2017 11:23 PM2017-03-08T23:23:08+5:302017-03-08T23:23:08+5:30

रुग्णसंख्या ४० वर; रक्ततपासणी अहवाल मिळणार ताबडतोब

Another statistic in the Bandh, 'Positive' | बांद्यात आणखी एक माकडताप ‘पॉझिटिव्ह’

बांद्यात आणखी एक माकडताप ‘पॉझिटिव्ह’

Next



बांदा : बांदा-सटमटवाडी येथील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माकडताप बाधित रुग्णांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे, तर बुधवारी निमजगावाडी येथे मृत माकड आढळून आल्याने मृत माकड आढळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. जगदीश पाटील यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
मागील तीन महिन्यांपासून बांदा येथे माकडतापाने थैमान घातले आहे. आतापर्यंत यामुळे चौघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ हवालदिल झाले असून, या तापाची भीती सर्वत्र दिसून येत आहे. सोमवारी रात्री पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व विभागांना माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा जलद राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून ही मोहीम तीव्र झाली आहे.
जोखीमग्रस्त भागात वनविभागाचे विशेष पथक तैनात झाले असून, सर्व परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू आहे. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. जाधव यांच्याशी चर्चा करीत ग्रामस्थांची असलेली नाराजी लक्षात घ्या व काम करा, असे आदेश दिले. यावर डॉ. जाधव यांनी संपूर्ण परिसरात पशुधनचे पथक पाहणी करीत असून, सर्व पाळीव जनावरांना इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगितले. गोठा निर्जंतुक करण्यासही सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त तालुक्यांचा कार्यभार असल्याने थोडी दिरंगाई झाल्याचे त्यांनी सांगताच नाडकर्णी यांनी त्यांना तूर्तास इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष देऊन काम करा, असे सांगितले.
डॉ. जगदीश पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, प्लेटलेट संतुलन आणि रक्ततपासणी यंत्रणा असणे आवश्यक असून, बुधवारपासून रक्ततपासणी यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यामुळे रक्ततपासणी अहवाल त्वरित मिळणार आहे. उपाध्यक्ष नाडकर्णी यांनी आपला अर्धा निधी येथील डीएमपी आॅईलसाठी दिला असून, गरज असेल तर उरलेला निधीही देतो, असे डॉ. पाटील यांना सांगितले.बांद्याबरोबरच नजीकच्या पत्रादेवी-गोवा हद्दीतही दोन दिवसांत तीन मृत माकडे आढळून आली आहेत.
गोवा राज्य सरकारने याठिकाणी वनविभागाचे विशेष पथक पाठविले आहे. दरम्यान, याठिकाणी सापडलेल्या माकडांचे त्या ठिकाणीच शवविच्छेदन करण्यात आले असता ती माकडे केएफडी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच मुबलक औषधे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बांदा सरपंच बाळा आकेरकर, संजय विर्नोडकर, डॉ. संतोष संगमवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Another statistic in the Bandh, 'Positive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.