माकडतापाचा आणखी एक बळी
By admin | Published: April 2, 2017 11:52 PM2017-04-02T23:52:57+5:302017-04-02T23:52:57+5:30
मृतांची संख्या पोहोचली नऊवर : ७१ जणांना माकडतापाची लागण; प्रशासनावर स्थानिकांचा रोष
बांदा : बांदा-सटमटवाडी येथील सुरेश तुकाराम सावंत (६0) यांचे माकडतापाने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे निधन झाले. आतापर्यंत माकडतापाने मृत पावलेल्यांची संख्या ही नऊवर पोहोचली असून स्थानिकांचा प्रशासनावर रोष वाढत आहे. आतापर्यंत माकडतापाची लागण झालेल्यांची संख्या ही ७१ वर पोहोचली आहे.
सुरेश सावंत यांना ताप येत असल्याने २२ मार्च रोजी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात त्यांना दाखल केले होते. दोन दिवसानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. २५ मार्च रोजी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांना माकडतापाची (केएफडी) लागण झाल्याचा अहवाल दोन दिवसांनी आरोग्य विभागाला मिळाला होता. त्यांच्यावर बांबोळी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
रविवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. माकडतापाने आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन माकडताप रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत अपयशी ठरल्याने स्थानिकांमधून रोष व्यक्त होत आहे. मृत माकड मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या दोन दिवसांत बांदा, गाळेल व डेगवे परिसरात ५ माकडे मृतावस्थेत आढळली आहेत.
बांदा शहरातील देऊळवाडी परिसरातही काही माकडे ही मरणासन्न स्थितीत आहेत. मृत सुरेश सावंत यांची पत्नीही काही दिवसांपूर्वी सावंतवाडी येथील रुग्णालयात पंधरा दिवस आजारी होती.
आतापर्यंत १८७ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७१ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. गोवा-बांबोळी रुग्णालयात पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये सटमटवाडी येथील दोन व गाळेल येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
त्यातील गाळेल येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात सटमटवाडी येथील एक व गाळेल येथील दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. जगदीश पाटील यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
मोलमजुरी करुन चालवित होते उदरनिर्वाह
रविवारी पहाटे मृत झालेले सुरेश सावंत हे मुळचे भिकेकोनाळ (ता. दोडामार्ग) येथील आहेत. त्यांनी सटमटवाडी येथे घर बांधल्याने तेथेच ते स्थायिक झाले आहेत. मोलमजुरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.