‘अंनिस’चे गुरुवारी राज्यभर आंदोलन : मुक्ता दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 12:37 AM2015-08-18T00:37:01+5:302015-08-18T00:40:13+5:30

दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच : युती सरकारला पडला विसर

'Anyan' in the statewide movement on Thursday: Mukta Dabholkar | ‘अंनिस’चे गुरुवारी राज्यभर आंदोलन : मुक्ता दाभोलकर

‘अंनिस’चे गुरुवारी राज्यभर आंदोलन : मुक्ता दाभोलकर

Next

दापोली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. हा खून काँग्रेस सरकारच्या काळात झाला होता. त्यावेळी विरोधी बाकावर बसणारे युती सरकारला आघाडी सरकारचा राजीनामा हवा होता; मात्र ते सरकार गेले व विरोधी पक्षाचे सरकार आले. परंतु, त्यावेळी राजीनामा मागणारे युतीचे सरकार आता गप्प का? सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी अंनिस राज्यभर आंदोलने, रॅली, रस्त्यावर उतरून रिंगण नाट्य, विवेकाच्या निर्धाराची गाणी म्हणून निषेध करणार आहेत, अशी माहिती अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांचा खून झाला होता त्या ठिकाणी सव्वासात वाजता सुरुवात होणार आहे. पुणे येथून सुरुवात झाल्यावर महाराष्ट्रभर सरकारचा वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, डॉ. दाभोलकर यांचा खून म्हणजे विचारांचा खून आहे. विचारांचा विचारांनी सामना करण्याऐवजी त्यांचा खून करून विचार संपविण्याचा प्रयत्न २० आॅगस्ट २०१३ रोजी झाला. त्यांच्या खुनाला दोन वर्षे झाली. अजूनही सरकारला खुनी सापडलेला नाही. सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी व या दिवशी विचारांचा खून करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवशी राज्यातील प्रत्येक भागात अंनिस आंदोलन, निषेध मोर्चा रॅली काढून सरकारचा निषेध करणार आहे. ज्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही अशांनी काळे कपडे परिधान करून किंवा काळी फीत बांधून काळा दिवस पाळावा व सरकारचा जाहीर निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला सहा महिने पूर्ण झाली. दोन्ही खुनांमध्ये साम्य आहे. खुनाच्या पद्धती सारख्या आहेत. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय करीत आहे, तर पानसरे यांच्या खुनाचा तपास महाराष्ट्र पोलीस करीत आहेत. सीबीआय व पोलीस यांनी दोघांच्या खुनाचा तपास एकत्रितपणे करायला हवा. कारण खुनांमध्ये बरेचसे साम्य आहे; परंतु दोन्ही खुनांतील आरोपींचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारच्या तपासाबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. डॉ. दाभोलकर खुनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचेही मुक्ता म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांशी २० जुलैला चर्चा झाली होती. या चर्चेत खुनाच्या तपासासंदर्भात चर्चा झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी सीबीआयच्या तपासासंदर्भात पंतप्रधानांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत कोणताही संदेश न दिल्याने केवळ आश्वासन देऊन बोळवण केली असल्याचे वाटते असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला तेव्हा सरकार विरोधात तांडव करणाऱ्यांनी स्वत: सत्तेत आल्यानंतर कॉ. गोविंद पानसरेंचा खून झाला तेव्हा तत्काळ खुनी पकडणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. तपासाला गती नाही. समकालीन सुधारकांचा दिवसा ढवळ्या खून होतो. तरीसुद्धा सरकारला खुनी सापडत नाही. समकालीन सुधारकांना खून हीच शिक्षा म्हणावी का? महापुरुष, संतांच्या महाराष्ट्रात विचारांचा खून होत असेल तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?
- मुक्ता दाभोलकर

Web Title: 'Anyan' in the statewide movement on Thursday: Mukta Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.