अपंगाची एस. टी.कडून क्रूर चेष्टा
By admin | Published: March 30, 2015 10:39 PM2015-03-30T22:39:25+5:302015-03-31T00:21:59+5:30
शोधपथकाने ‘समाजकल्याण’चे ओळखपत्रही नाकारले
लांजा : अपंग प्रवाशांकडे शासनाचे अधिकृत अपंग असल्याचे ओळखपत्र असतानाही बोगस कार्ड शोध मोहीम पथकाने चक्क या कार्डला बोगस ठरवत अपंग प्रवाशाला पूर्ण तिकीट दिले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, लांजा आगारातील चालक-वाहक बुचकाळ्यात पडले आहेत.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस. टी. महामंडळाला बोगस कार्ड असणाऱ्या कार्डधारकांची शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लातूर मार्ग तपासणी पथक दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहे. सोमवारी सकाळी झर्ये - लांजा या एस. टी.मधून कोंडगे ते लांजा प्रवास करण्यासाठी ज्ञानदेव विठोबा विश्वासराव कोंडगे येथे बसले. एक दीड किलोमीटर एस. टी. पुढे आल्यानंतर मार्ग तपासणी पथक रिंगणे कोंड येथे उभे होते. त्यांनी एस. टी. थांबवल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची तिकीट तपासणी केल्यानंतर विश्वासराव यांच्याकडे या पथकाने विचारणा केली. त्यांनी आपले अर्धे तिकीट असल्याचे दाखवले. आपण अपंग असल्याचे ओळखपत्र दाखवा. मागणी केल्यानंतर त्यांनी समाजकल्याण विभागाने दिलेले ओळखपत्र दाखवले. त्यामध्ये ज्ञानदेव विश्वासराव यांचा अर्धा फोटो असल्याने त्यांनी आपण अपंग आहात कशावरुन, तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र दाखवा, अशी मागणी केली. त्यानुसार विश्वासराव यांनी ते दाखवले. त्या प्रमाणपत्रावरदेखील अर्धा फोटो होता.या मार्ग तपासणी पथकामध्ये प्रमुख म्हणून सिद्धेश्वर रासुरे, मोहनराव पाटील, गणेश ढेकणे आदी मंडळी होती. या पथकाने आपण अपंग आहात, तसा पूर्ण फोटो ओळखपत्रावर असणे आवश्यक आहे, असे सांगितले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र खोटे ठरवत ज्ञानदेव विश्वासराव यांच्यावर बोगस कार्ड वापरत असल्याचा संशय घेत त्यांना पूर्ण तिकीट काढण्यास भाग पाडले.विश्वासराव यांनी या पथकाच्या विरोधात लेखी तक्रार आगार व्यवस्थापक यांच्या नावे दिली आहे. त्यानंतर अचानक अशा प्रकारे कारवाई करण्यात आल्याने वाहक - चालक बुचकाळ्यात पडले. त्यांनी तत्काळ या शोधपथकाला बोलावून जाब विचारला. लातूर मार्ग तपासणी पथकाने अशा प्रकारची कारवाई केल्याने एस. टी. कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार बोगस कार्डधारकांची शोधमोहीम सुरु.
लांजात लातूर येथून कार्ड शोधपथक दाखल.