समाजस्वास्थ्यासाठी सर्वत्र ‘आप्पा’ तयार व्हावेत

By Admin | Published: February 9, 2015 09:27 PM2015-02-09T21:27:25+5:302015-02-10T00:26:42+5:30

राजदत्त : आप्पासाहेब पटवर्धन यांच्यावर चित्रपट, शासनाच्या माध्यमातून निर्मिती

The 'Apepa' can be prepared everywhere for social health | समाजस्वास्थ्यासाठी सर्वत्र ‘आप्पा’ तयार व्हावेत

समाजस्वास्थ्यासाठी सर्वत्र ‘आप्पा’ तयार व्हावेत

googlenewsNext

कणकवली : लोकांना नुसत्या सवलती देऊन समाजस्वास्थ्य निर्माण होणार नाही. त्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणारे ‘आप्पा’ तयार व्हावे लागतात. आप्पांनी दाखवलेल्या विचारांच्या दिशेने मने चेतवण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटली, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांनी वागदेतील गोपुरी आश्रमात व्यक्त केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, विजय गावकर आदी उपस्थित होते. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारविनीमय करण्यासाठी राजदत्त हे गोपुरी आश्रमात सोमवारी आले. शासनाच्या माध्यमातून हा चित्रपट तयार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार जठार यांनी सांगितले. राज दत्त म्हणाले की, आप्पांचे चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. यातून समाज बदलेल अशी अपेक्षा नाही.परंतु समाजमन किमान अस्वस्थ व्हावे, असा उद्देश आहे. समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल ओरड मारणाऱ्यांचा आवाज मोठा होतो आणि त्यातून कार्य काही होत नाही. आप्पांनी शांतपणे आपल्याला शक्य होईल ते सर्वसामान्य माणसाने करावे, हा संदेश आपल्या कृतीतून दिला. प्रत्येकाने आपला सांदीकोपरा उजळ करावा, असे प्रत्येकाने ठरवले असते तर देशाची आजची जी स्थिती आहे ती दिसली नसती. नुसते कायदे बदलून, आदेश देऊन समाजस्थिती बदलणार नाही. प्रत्येकाला समर्पित काम करावे लागेल. आपल्या सोबत काम करणाऱ्यांची मने चेतवता आली पाहिजेत. ते काम आप्पांनी केले. स्वच्छतेचा डंका आज वाजतो आहे. त्या काळी आप्पांनी बोलत न राहता करून दाखवले. लोकांची मने स्वच्छ करण्याकडे आजच्या काळात लक्ष दिले पाहिजे.
आपल्याकडील अब्जोवधी रूपये स्विसबॅँकेत ठेवून लोकांना कोणता आनंद मिळतो, हे समजत नाही. आप्पांनी चलनशुद्धीचा विचार त्या काळात केला. ही प्रक्रिया राबवली असती तर आज स्विस बॅँकेतून काळा पैसा आणण्याचा विचारही करावा लागला नसता, असे राज दत्त म्हणाले. सर्वसामान्यत्वातून असामान्य व्यक्तिमत्त्वापर्यंतचा आप्पांचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहाचला तर प्रत्येक सामान्याला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी राजदत्त यांनी केली.
(प्रतिनिधी)

राजदत्त दोन दिवस आश्रमात
आप्पांच्या संदर्भातील आठवणी किंवा चित्रपट निर्मितीसंदर्भात सूचना करायच्या असल्यास गोपुरी आश्रमात लिखित स्वरूपात आणून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राजदत्त दोन दिवस गोपुरी आश्रमात वास्तव्य करणार आहेत.

Web Title: The 'Apepa' can be prepared everywhere for social health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.