औषध फवारणी करण्याचे आवाहन
By admin | Published: December 14, 2014 08:08 PM2014-12-14T20:08:29+5:302014-12-14T23:52:42+5:30
रोग नियंत्रण : वेंगुर्ले प्रादेशिक संशोधन केंद्राचा सावधगिरीचा इशारा
वेंगुर्ले : तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणही ढगाळ बनले आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आंबा व काजू पिकांवरील रोगांच्या नियंत्रणाकरिता वेंगुर्ले प्रादेशिक संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती ही पावसाळी सदृश असून हवामान खात्याने हलका पाऊस व ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. नवीन येणाऱ्या मोहोरावर फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असल्याने फुलकिडींच्या नियंत्रणासाठी ४५ टक्के स्पिनोसॅड २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून झाडावर फवारावे.
पावसाळी सदृश वातावरणामुळे काजू पिकात आलेल्या नवीन पालवीवर ढेकण्या या किडीचा प्रादुर्भाव होेण्याची शक्यता आहे. त्यासाठी ३६ टक्के मोनाक्रोटोफॉस १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे.
ज्या ठिकाणी मोहोर आलेला आहे, अशा ठिकाणी ढेकण्या या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ३५ टक्के प्राफेनोफॉस १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून मोहोरावर फवारावे. (प्रतिनिधी)
करपा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शक्य
आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याकरिता थायोमेथॉक्झाम या औषधाची १ ते २ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाडावर फवारणी करावी. तसेच आंब्यावर भुरी तसेच करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी कार्बेन्डॅझिम (१० ग्रॅम), थायोफिनेट मिथील (१० ग्रॅम) किंवा प्रॉपिनेब (२० ग्रॅम) प्रती १० लिटर पाणी झाडावर फवारावे.