चार उपजिल्हाधिकारी पदांची नियुक्ती
By admin | Published: July 4, 2014 10:59 PM2014-07-04T22:59:51+5:302014-07-05T00:01:23+5:30
महसूल विभागात आता चार कायमस्वरूपी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे व एक तहसीलदार अशा तीन अधिकाऱ्यांची बदली तर नव्याने सहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व एका तहसीलदारांची नियुक्ती सिंधुदुर्गात झाली आहे. यामुळे महसूल विभागात आता चार कायमस्वरूपी उपजिल्हाधिकारी पदे भरली गेली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम नुकताच झाला. यात सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांची बदली होऊन त्याजागी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती झाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी विशेष भूसंपादन अधिकारी ठाणे येथे कार्यरत असलेले अभय करगुटकर यांची नियुक्ती झाली आहे. सावंतवाडी तहसीलदार वीरसिंह वसावे यांची रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे तहसीलदारपदी बदली झाली तर त्यांच्या जागी मुंबई-कुलाबा येथे अतिक्रमणे व निक्षासन या पदावर काम करणारे सतीश कदम यांची सावंतवाडी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या तीनही अधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
चार विभागांना मिळाले कायमस्वरूपी उपजिल्हाधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोजगार हमी योजना या चार विभागांना गेले काही महिने ही पदे रिक्त होती. मात्र यावर्षी या चारही पदांवर उपजिल्हाधिकारी दर्जाचे कायमस्वरूपी अधिकारी मिळणार आहेत. यामध्ये रायगड येथील मुरूड भूसंपादन अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या जे. जी. मुरूडकर यांची सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रवि पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून उरण उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्रीधर डुबे यांची नियुक्ती झाली आहे तर रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारीपदी श्रीवर्धन उपविभागीयपदी कार्यरत असलेले जयराम देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे.
दरम्यान, या चारही अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्याने आपला अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार असल्याचे महसूल सामान्य प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
¸fWX