३७ कोटी ५0 लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By Admin | Published: March 16, 2016 08:26 AM2016-03-16T08:26:45+5:302016-03-16T08:29:50+5:30
वित्त समिती सभेत माहिती : १८ मार्चच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवणार
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या वित्त समिती सभेत सन २०१५-१६ साठी २३ कोटींचे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक व सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १४ कोटी ५० लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या दोन्ही अंदाजपत्रकांना या सभेत मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी १८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची विशेष सभा सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष नार्वेकर, सोनाली घाडीगांवकर, रिटा अल्फान्सो, सुगंधा दळवी, समिती सचिव तथा लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
२०१५-१६ च्या सुधारीत अंदाजपत्रकात ५ कोटी ९० लाख ५७ हजार ३०० रुपये आरंभीची शिल्लक होती. ती शिल्लक अंतिम सुधारीत अंदाजपत्रक तशीच शिल्लक राहिली आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ती ५० हजार रुपये दाखविण्यात आली आहे. सन २०१५-१६ चे सुधारीत अंदाजपत्रक १९ कोटी ७० लाख ३५ हजार रुपयांचे होते. यात ३ कोटी २९ लाख ६५ हजाराने वाढ करून २३ कोटींचे झाले.
जिल्हा परिषद इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ६३ लाख तर जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी निवास दुरुस्तीसाठी ३५ लाख रुपये एवढा निधी जर दरवर्षी दिला जात असेल तर आमच्या मतदारसंघाचा विकास कसा होणार असा सवाल यावेळी सदस्य सुरेश ढवळ यांनी उपस्थित केला व सभागृहात नाराजी व्यक्त केली.
सन २०१६-१७ या आगामी सुधारीत अर्थसंकल्पाचे सभागृहात वाचन करण्यात आले. यात समिती सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने यातील कित्येक योजनांचा निधी अन्य योजनांवर वळता करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद भवनातील सभागृहांच्या अंतर्गत सुविधा पुरविण्यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली होती. यावर आक्षेप घेतला. हा सर्व निधी ग्रामीण भागातील रस्ते व पायवाटांवर वळविण्यात आला. जिल्हा परिषद इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ६३ लाख तर जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी ३५ लाख एवढ्या निधीला सदस्य सुरेश ढवळ यांनी आक्षेप नोंदविला. (प्रतिनिधी)
एकाच योजनेला दोनदा निधी
सुधारीत अर्थसंकल्प सादर करताना विंधन विहीर दुरुस्तीसाठी १० लाख तर बोअरवेल्ससाठी १८ लाखांची तरतूद केली आहे. मात्र, बोअरवेल व विंधन विहिर हा एकच प्रकार असल्याचे सदस्यांच्या लक्षात येताच संबंधित लघुपाटबंधारेच्या यांत्रिकीकरणाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. तर त्या अधिकाऱ्याने आपल्या बचावाखातर हा बऱ्याच वर्षांपूर्वी निर्माण केलेला हेड असल्याचे सांगितले.
बेघरांना निधीची तरतूद करा
सिंधुदुर्गात शेकडो बेघरांची संख्या आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. त्यामुळे अशा बेघर लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र हेड निर्माण करा असे आदेश यावेळी देण्यात आले.