दीड कोटीच्या कामांना मंजुरी
By admin | Published: June 14, 2016 11:16 PM2016-06-14T23:16:31+5:302016-06-15T00:03:24+5:30
बंदर विकास कार्यक्रम : पावसाळी हंगामानंतर कामाला सुरुवात ; प्रस्तावित जागेची पाहणी
मालवण : बंदर विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ तून मालवण तालुक्यातील बंदरांचा विकास करण्यासाठी १ कोटी ५५ लाख किंमतीची सात विविध कामे प्रस्तावित आली आहेत. मच्छिमार व स्थानिक यांनी सूचित केलेल्या या कामांची जागा निश्चिती व पाहणी मंगळवारी बंदर, पत्तन व मत्स्य अधिकारी तसेच जिल्हा दक्षता समितीचे सदस्य व मच्छिमार प्रतिनिधी हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संबंधित विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र व विविध परवानगीची पूर्तता करून पावसाळी हंगामानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामांची पाहणी व जागा निश्चिती मंगळवारी करण्यात आली. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त व्ही. बी. कांबळे, मत्स्य अधिकारी मालवणकर, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, पत्तन विभागाचे कनिष्ठ अभियंता बोधिकर यांच्यासह मच्छिमार प्रतिनिधी हरी खोबरेकर, नरेश हुले, जेम्स डायस तसेच महिला मच्छिमार व अन्य उपस्थित होते.
मच्छिमारांना विश्वासात घेऊनच ही जागा निश्चिती करण्यात आली आहे, असे सांगताना हरी खोबरेकर यांनी महिला मच्छिमार मत्स्य व्यावसायिक या सर्वांना विचारात घेऊनच मंजूर झालेली कामे पूर्ण करून घेतली जातील असे
सांगितले. (प्रतिनिधी)
मासळी सुकवण्याचा चौथरा बांधणार
मालवण पालिका मासळी मार्केटजवळ मासळी सुकवण्याचा चौथरा बांधणे २५ लाख रुपये, मच्छिमार्केट निवारा शेड उभारणी २५ लाख, मच्छिमार्केटजवळ लिलावगृह २५ लाख, मच्छिमार्केट जवळ स्लोपिंग रँप २५ लाख, दांडी आवार येथे मासळी लिलावासाठी चौथरा उभारणे २५ लाख, निवारा शेड २५ लाख तसेच सर्जेकोट बंदरात मार्गदर्शक दिवे बसविणे ५ लाख रुपये अशी १ कोटी ५५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली.