मूळ अंदाजपत्रकालाच मंजुरी
By admin | Published: January 13, 2016 09:49 PM2016-01-13T21:49:26+5:302016-01-13T21:49:26+5:30
ठराविक केले बदल : वेंगुर्ले पंचायत समिती सभा
वेंगुर्ले : मूळ अंदाजपत्रकात काही आमुलाग्र बदल सुचवून त्यास मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली.
सभा सभापती सुचिता वजराटकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती स्वप्नील चमणकर, पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, सुनील मोरजकर, पुरूषोत्तम परब, अभिषेक चमणकर, सावरी गावडे, चित्रा कनयाळकर, उमा मठकर, प्रणाली बंगे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट व विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेची सुरूवात जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच वेंगुर्लेचे सुपुत्र महाकवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतून जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या सर्व खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
मागील सभेत शेतकऱ्यांना कृषी विभागांतर्गत प्लास्टिक टप वाटप करण्याचे ठरविले होते. पण कृषी विभागाच्या निधीतून प्लास्टिक टप वाटप करता येणार नसल्याने कृषी विभागाचे मार्गदर्शन न घेता संकीर्ण या हेडखाली हे प्लास्टिक टप वाटप करण्याचे ठरले. यासाठी ९० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ताडपत्री वाटपासाठी ३ लाख, तर बायोगॅससाठी १ लाख ८० हजारची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अनुदानित जे साहित्य दिले जाते, ते दुय्यम दर्जाचे दिले जाते. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी सूचना अभिषेक चमणकर यांनी केली. यावेळी ६४ हजार शिलाई अधिक बिडींग मशीन व २० हजार रूपये सायकलसाठी असा निधी मंजूर करण्यात आली. तसेच इमारत दळणवळणासाठी तीन लाखाची तरतूद करण्यात आली. कामांसाठी नेमलेले कंत्राटदार ती कामे पूर्ण करण्यासाठी कमी पडतो. त्यामुळे अडथळे येतात, अशी कामे पूर्ण होईपर्यंत त्याकडे लक्ष देण्याची सूचना सभापती सुचिता चमणकर यांनी केली. (प्रतिनिधी)
कुपोषित मुलांची संख्या वाढली
वेंगुर्ले तालुक्यात कुपोषित व कमी वजनाच्या मुलांची संख्या ६१ वर गेली असून, ती नियंत्रित राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, असा प्रश्न अभिषेक चमणकर यांनी उपस्थित केला. यावेळी प्रत्येक गावात मातांच्या बैठका घेऊन पालकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करून संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यावेळी म्हणाले.