महामार्ग मोबदल्याचे अडीच कोटींचे प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:24 PM2020-11-20T18:24:14+5:302020-11-20T18:27:46+5:30
highway, kankvali, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत जमीन मोबदला व मूल्यांकनाच्या अनुषंगाने लवादाकडे गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मंजूर रकमेबाबत ४ कोटी १० लाख रुपयांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी ६४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मूळ मंजूर ५२७ कोटी रुपयांच्या निवाड्यांपैकी आतापर्यंत ४८० कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे. आता सुमारे १४७ कोटी रुपयांचे वाटप शिल्लक राहिले आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत जमीन मोबदला व मूल्यांकनाच्या अनुषंगाने लवादाकडे गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मंजूर रकमेबाबत ४ कोटी १० लाख रुपयांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी ६४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मूळ मंजूर ५२७ कोटी रुपयांच्या निवाड्यांपैकी आतापर्यंत ४८० कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे. आता सुमारे १४७ कोटी रुपयांचे वाटप शिल्लक राहिले आहे.
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत जमिनीचा दर कमी असणे वा मूल्यांकन कमी झाल्याच्या मुद्यावर काही प्रकल्पग्रस्तांनी लवादाकडे धाव घेतली होती. लवादाकडे दाद मागितलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी काही प्रकरणांचे निकाल देण्यात आले असून प्रांताधिकारी कार्यालयाकडून वाढीव मोबदल्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यामध्ये चार कोटी १० लाख रुपयांच्या प्रस्तावांचा समावेश होता.
यापैकी २ कोटी ६४ लाख रुपये एवढा मोबदला देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित लाभार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून महाभूमीच्या माध्यमातून थेट खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतरही तालुक्यात १६ गावांमधील काही ठिकाणचे सर्व्हे नंबर मिसिंग होते. याबाबत संयुक्त मोजणी करून संबंधित कार्यवाही पूर्ण करीत निवाडे पाठविण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. निवाड्यानुसार एकूण ५२७ कोटी ५४ लाख एवढा निवाडा मंजूर होत निधी प्राप्त झालेला होता.
५ कोटी ९ लाख रकमेचे निवाडे शिल्लक
महामार्ग चौपदरीकरणाच्या अनेक अडचणींवर मात करत आतापर्यंत ४८० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर १७ निवाडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले होते. यापैकी ११ निवाड्यांचे १४.२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर शिल्लक ६ निवाडे ५ कोटी ९ लाख रकमेचे आहेत.