जिल्ह्यातील दोन पीयुसी केंद्रांची मान्यता रद्द
By admin | Published: January 5, 2016 10:57 PM2016-01-05T22:57:53+5:302016-01-06T00:41:34+5:30
किरण बिडकर यांची माहिती : चार केंद्रांची मान्यता निलंबित, वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या, परिवहन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना
सिंधुुदुर्गनगरी : प्रदूषणमुक्त वाहन (पी.यु.सी.) असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणाऱ्या सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सहा केंद्रांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने चांगलाच दणका दिला आहे. पीयुसी केंद्रासंबंधी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अचानक टाकण्यात आलेल्या धाडीत दोषी आढळलेल्या दोन पीयुसी केंद्रांची मान्यता रद्द तर चार केंद्रांची मान्यता निलंबित करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली. जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणाची समस्या भेडसावत आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे पीयुसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) चाचणीसाठी आरटीओची काही अधिकृत केंद्रे आहेत. सन २००९-१० साठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात १८ पीयुसी केंद्राची स्थापना केली होती.
या केंद्रामार्फत वाहन प्रदूषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यातील वरील मान्यताप्राप्त पीयुसी केंद्रांसंबंधी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डिसेंबरअखेर जिल्ह्यातील १८ पीयुसी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याचे ठरले. त्यानुसार जिल्ह्यात पाच पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी एकाच वेळी सर्व केंद्रांची तपासणी केली, अशी माहिती किरण बिडकर यांनी दिली.
तपासणी करताना काही पीयुसी केंद्रांच्या कामकाजात त्रुटी आढळून आल्या. यामध्ये पीयुसी मशीन बंद असणे, मशीनचे कॅलीब्रेशन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार केलेला नसणे, देण्यात आलेल्या पीयुसी प्रमाणपत्राचा अभिलेखन न ठेवणे, मासिक अहवाल कार्यालयात हजर न करणे, मशीन बंद असताना पीयुसी प्रमाणपत्र देणे आदी त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार केंद्रांना खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सहा केंद्रांच्या सूचना अमान्य असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी उगारलेल्या या बडग्यामुळे वाहनचालकांमध्येही खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
कारवाई करण्यात आलेली केंद्रे
गुरूमाऊली पीयुसी सेंटर, सडेवाडी, ता. मालवण, समुद्रा पीयुसी सेंटर वेताळ बांबर्डे, आशीर्वाद पीयुसी सेंटर कसई, ता. दोडामार्ग, आणि गोल्डननगर पीयुसी सेंटर कुंभारमठ, ता. मालवण. या केंद्रांची मालमत्ता निलंबित केली आहे.
आर.एस.पी.यु.सी. सेंटर इन्सुली, सावंतवाडी आणि भराडीदेवी पीयुसी सेंटर साळगाव, ता. कुडाळ या केंद्रांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.
बंदी आदेशाचे पालन न केल्यास संबंधित पीयुसी धारकांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.