कर्ली वसिष्ठी नदीवर साकव मंजूर
By admin | Published: March 10, 2015 11:19 PM2015-03-10T23:19:21+5:302015-03-11T00:06:39+5:30
‘लोकमत’चा पाठपुरावा : दुकानवाड ग्रामस्थांत समाधान
शिवापूर : पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनणारे माणगाव खोऱ्यातील कर्ली व वसिष्ठी नदीवरील लोखंडी साकव मंजूर झाल्याने दुकानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या साकवाबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता.माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पंचक्रोशीमध्ये शिवापूर, वसोली, उपवडे, आंजिवडे व हळदीचे नेरूर ही गावे येतात. या गावातून शिवापूर या ठिकाणी उगमस्थान असलेली व शेवटी कर्ली येथे समुद्राला जाऊन मिळणारी कर्ली नदी तसेच वसिष्ठी या दोन नद्या वाहतात. वसिष्ठी ही दुकानवाड बाजारपेठेनजीक येऊन कर्ली नदीला येऊन मिळते. वसोली, उपवडे, हळदीचे नेरूर ही गावे महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येतात. सन १९८१ ला या धरणाची अधिसूचना निघाल्यानंतर या गावातील सर्व विकासात्मक कामे ठप्प झाली. त्यामुळे या भागातील रस्ते मातीचेच होते.या भागात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने तसेच हा भाग बुडीत क्षेत्रात येत असल्याने नद्यांवर पक्के पूल नव्हते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या भागातील लोकांना सावंतवाडी, कुडाळ, माणगाव या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात पर्याय म्हणून शासनाच्यावतीने दुकानवाड, वसोली कुत्रेकोंड, सतयेवाडी नजीक व शिवापूर कोठीवाडी या ठिकाणी लोखंडी साकव टाकण्यात आले होते. पावसाळ्यात कर्ली नदी जेव्हा दुथडी भरून वाहते, तेव्हा हे लोखंडी साकवच लोकांचा आधारवड बनतात.साधारण १९९८-९९ च्या दरम्यान या भागाला योग्य नेतृत्व मिळाल्याने धरणापासून अडलेल्या विकासाबाबत विचारमंथन करून सन १९८१ पासून १९९८ पर्यंत धरण न झाल्याने येथील विकास खुंटलेल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच रस्ते, पूल, साकवांच्या मंजुरीबाबत पाठपुरावा केला. गेली कित्येक वर्षे योग्य डागडुजी नसल्याने या भागातील सर्व साकव जीर्ण झालेले असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.याबाबत ‘लोकमत’ने वारंवार सचित्र माहिती प्रसिद्ध करून ग्रामस्थांच्या या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती व हळदीचे नेरूर पंचायत समितीचे सदस्य यांनी या साकवांसाठी विशेष प्रयत्न करून पुळास, दुकानवाड बाजार, मोरे, चौकलेबाग, वसोली कुत्रेकोंड, सतयेवाडी तसेच कोठीवाडा येथील लोखंडी साकव मंजूर करून घेतल्याने दुकानवाड पंचक्रोशीतून समाधान व्यक्त होत आहे. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रतिभा
म्हाडगूत यांनीही प्रयत्न केले होते. (वार्ताहर)