उत्पादन शुल्कचा ‘एप्रिल फुल’
By admin | Published: March 31, 2015 09:38 PM2015-03-31T21:38:11+5:302015-04-01T00:09:39+5:30
दारू साठ्याच्या तक्रारीनंतर शोधाशोध
बांदा : शेर्ले-कुसवाळ परिसरात दारुचा बेकायदा साठा असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने तब्बल दोन तास जंगल परिसरात कसून तपासणी केली. मात्र, भरारी पथकाच्या हाती काही न लागल्याने या उत्पादन खात्यालाच ‘एप्रिल फुल’ बनावे लागल्याची चर्चा रंगली.आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच खात्यांची ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्याला उत्पादन शुल्क खाते देखील अपवाद नाही. शेर्ले-कुसवाळ येथील जंगल परिसरात अज्ञाताने बेकायदा दारुचा साठा केल्याची माहिती निनावी फोनद्वारे उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाला देण्यात आली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठी कारवाई मिळण्याच्या खुशीत उत्पादन खात्याच्या भरारी पथकाने दोन गाड्यांच्या सहाय्याने भर दुपारीच शेर्ले परिसर गाठला.बांदा-शेर्ले मार्गावरच गाड्या उभ्या करुन या खात्याचे अधिकारी व कर्मचारी कुसवाळ परिसरातील जंगलात बेकायदा दारुच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तब्बल दोन तास याठिकाणी कसून तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मोठ्या प्रमाणात अधिकारी आल्याने उपस्थितांनी याठिकाणी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
‘एप्रिल फुल’ बनला चर्चेचा विषय
दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती काहीच न लागल्यामुळे आपल्याला कोणीतरी ‘एप्रिल फुल’ केल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाचे ‘एप्रिल फुल’ झाल्याने स्थानिकांमध्ये मात्र हा चर्चेचा विषय बनला होता.