एप्रिल महिना राजकीय रणधुमाळीचा
By admin | Published: March 25, 2015 10:12 PM2015-03-25T22:12:30+5:302015-03-26T00:10:24+5:30
आचारसंहिता सुरू : ग्रामपंचायत, जिल्हा बँक, सहकारी संस्थांच्या निवडणुका
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील होऊ घातलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तसेच विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच आता सिंधुदुर्गातील आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. तर याचवेळी ७८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांसाठी २२ एप्रिलला मतदान व २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
राज्याच्या निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केल्यानंतर मंगळवारपासूनच संबंधित गावाच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच तसेच विकास सोसायट्यांच्या निवडणुकात चांगलीच रंगत भरली असताना त्यात ग्रामपंचायत निवडणुकीची भर पडली आहे. या ७२ ग्रामपंचायतींची मुदत मे ते आॅगस्ट या दरम्यान संपत असल्याने या निवडणुका शांततेत व पारदर्शकरित्या पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.जिल्ह्यात पार पडलेल्या लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकींचे निकाल पहाता साऱ्यांचीच झोप उडविणारे ते निकाल होते. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुका तसेच सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व सिद्ध करेल हे अंदाज बांधणे सध्या मुश्किल बनले आहे. त्यात आता जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचा झेंडा लागणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या साऱ्या निवडणुकीत मात्र जिल्हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार हे मात्र निश्चित!
निवडणुकीच्यावेळी अनेक उमेदवार अर्ज भरतात. परंतु नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्यावेळी एक उमेदवार सोडून अन्य उमेदवार अर्ज मागे घेतात. अशावेळी तो उमेदवार इतर उमेदवारांना दबाव आणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतो ही शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे यापुढे असे प्रसंग घडल्यास राज्य निवडणूक आयोगास त्याबाबत सविस्तर अहवाल तत्काळ पाठवावा व राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ या योजनेबाबतच्या शासन निर्णयामध्ये या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे या उपाययोजनेचा समावेश असला तरी आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेच्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय किंवा उपविभागीय स्तरावरील अथवा तालुका स्तरावरील कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भाग घेतल्यास आचारसंहितेचा
भंग मानून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असेही निवडणूक विभागाचे निर्देश
आहेत. (प्रतिनिधी)
खर्च वेळेत सादर करण्याचे आवाहन
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित उमेदवाराने जिल्हा प्रशासनाकडे खर्च सादर करणे बंधनकारक आहे. जो उमेदवार खर्चाचा तपशील वेळेत सादर करणार नाही त्या उमेदवाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी याची राहणार आहे.
जिल्ह्यातील मुदती संपणाऱ्या ७२ ग्रामपंचायतींपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करणार. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व आहे ते तसेच कायम राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावागावातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
- संदेश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष
२२ एप्रिलला स्थानिक सुट्टी जाहीर
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे त्या क्षेत्रापुरती बुधवारी २२ एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.