सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

By सुधीर राणे | Published: June 21, 2023 02:16 PM2023-06-21T14:16:53+5:302023-06-21T14:17:26+5:30

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, ...

Arbitrary administration of Sindhudurg District Kabaddi Federation; Allegations of Kabaddi lovers, players | सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

googlenewsNext

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी फेडरेशनने काहीच केलेले नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंवर अन्याय झाला असल्याचा आरोप शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा क्रीडा भारती मुंबईचे अध्यक्ष रवींद्र करमळकर, कबड्डीप्रेमी बाळासाहेब सावंत, अण्णा कोदे, संघटक राजन रेडकर, नंदन वेंगुर्लेकर यांनी केला आहे.

तसेच जिल्ह्याच्या निवड चाचणीत प्रामाणिक खेळाडूंना बाद करत वशिलेबाजीने इतरांची नियुक्ती केली जाते.  जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या या चुकीच्या आणि मनमानी कारभारा विरोधात आम्ही महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

सिंधुदुर्गातील कबड्डी खेळाचे संवर्धन व्हावे, कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कणकवली येथे कबड्डी खेळाडू आणि कबड्डीप्रेमींची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघर्ष व उत्कर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी  संवाद साधला. यावेळी एनआयएस कबड्डी कोच दिनानाथ बांदेकर, रतनकुमार झाजम आदींसह कबड्डी खेळाडू उपस्थित होते. 

रवींद्र करमळकर म्हणाले, कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी आपण आजवर काम केले. मात्र जिल्हा फेडरेशनकडून कबड्डी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी कोणतेही चांगले काम झालेले नाही. जिल्ह्यात कबड्डीमध्ये अपप्रवृती बळावत आहे. आम्ही सिंधुदुर्गातील अन्यायग्रस्त कबड्डी पटूंच्या पाठीशी राहणार आहोत. येत्या काळात जिल्ह्यातील आठही तालुक्यात कबड्डी खेळाचे संवर्धन करण्याबरोबरच कबड्डीचा कृती आराखडा बनवणे, तंत्रशुद्ध प्रशिक्षण स्पर्धा भरवणे, सिंधुदुर्गातील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करणार असल्याचे  करमळकर यांनी सांगितले. 

नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या कारभाराबाबत अनेक खेळाडुंच्या तक्रारी आहेत. किशोर गट, कुमार गट, खुला गट या तीन गटांसाटी निवड चाचणी जिल्ह्याच्या विशिष्ट ठिकाणी लावली जाते. चुकीची कारणे दाखवत चांगल्या खेळांडुना डावलले जाते. निवड चाचणी सदस्यही त्यांचेच असतात. चाचणीत निवड झालेल्या खेळाडुंना हेतूपुरस्सर डावलेले जाते. फेडरेशन स्वतः आयोजक म्हणून कोणत्याही स्पर्धा घेत नाही. स्पर्धेच्या आयोजक मंडळांची दिशाभूल केली जाते. फेडरेशनकडे येणारे पैसे खेळाडुंवर खर्च होत नाहीत असा आरोपही वेंगुर्लेकर यांनी केला. 

अण्णा कोदे म्हणाले, कणकवलीतील प्रणय राणे या खेळाडूची निवड प्रो कबड्डीसाठी झाली. मात्र, फेडरेशनने त्याचा साधा सत्कारही केला नाही. ही शोकांतिका आहे. मग खेळाडुंना प्रोत्साहन मिळणार कसे? राजन रेडकर, बाळासाहेब सावंत यांच्यासह सर्वांनीच जिल्हा कबड्डी फेडरेशन विरोधात नाराजी व्यक्त केली.

Web Title: Arbitrary administration of Sindhudurg District Kabaddi Federation; Allegations of Kabaddi lovers, players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.