आमदारांचे आंदोलन थंड?
By Admin | Published: June 5, 2015 11:46 PM2015-06-05T23:46:58+5:302015-06-06T00:24:21+5:30
संजय कदम : नेत्रावती, मंगला एक्सप्रेसला खेडमध्ये थांबा नाही
खेड : खेड रेल्वेस्थानकात नेत्रावती आणि मंगला एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत अनेक निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, ढिम्म कोकण रेल्वे प्रशासनाने या दोन्ही जलद गाड्यांना अद्याप थांबा दिलेला नाही. याविरोधात खेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार संजय कदम यांनी दिला होता. त्याला दोन महिने होत आले तरी हे आंदोलन होऊ शकले नाही. त्यामुळे आंदोलनाची धार बोथट झाली की, वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होता. याबाबत चर्चा सुरू आहे.
आमदार संजय कदम यांनी लक्ष घातल्याने आता येथील स्थानिकांची समस्या लवकरच सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. खेड, दापोली आणि मंडगणड तालुक्यातून हजारो प्रवासी मुंबई, ठाणे तसेच पुणे यांसारख्या शहरात ये-जा करतात. गेल्या १० वर्षांपासून याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला विविध प्रकारे जाब विचारला जात आहे. या परिसरात डेंटल महाविद्यालय, एमबीए महाविद्यालय, कृषी विद्यापीठ आणि लोटे येथील घरडा इन्स्टिट्यूटसारख्या नामवंत कंपन्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे मंगला आणि नेत्रावती या दोन्ही गाड्यांना खेड रेल्वे स्थानकात थांबा दिल्यास त्याचा मोठा फायदा रेल्वे प्रशासनाला मिळू शकतो. मात्र, कोकण रेल्वे प्रशासन याचा गंभीरपणे विचार करत नसल्याने कोणत्याही क्षणी येथील प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो, अशी येथील स्थिती आहे. रेल्वे प्रवासी आणि जनतेला घेऊन हे आंदोलन करण्याची आवश्यकता असून, आमदारांच्या माध्यमातून हे आंदोलन झाल्यास त्याला बळकटी आली असती. मात्र, हे आंदोलन केवळ कागदावर राहिले आहे. आंदोलनाची धार आता बोथट झाली की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार कदम यांनी हे आंदोलन यशस्वी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
प्रयत्नांना यश येत नसल्याने नाराजी
कोकण रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे मिळविण्याबाबतच्या प्रयत्नांना अल्प यश.
खेड रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबे मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.
प्रखर आंदोलनाची गरज.