अकरा इच्छुकांच्या समर्थकांत वाद
By admin | Published: January 13, 2016 11:13 PM2016-01-13T23:13:21+5:302016-01-13T23:13:21+5:30
पक्षनिरीक्षकांची उडाली भंबेरी : वेंगुर्ले भाजपाध्यक्ष निवडीचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात
वेंगुर्ले : भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्षपदाच्या निवडीत दोन विचारसरणीचे गट निर्माण होऊन तब्बल अकराजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. तर समर्थकांनी वादंग निर्माण केल्यामुळे पक्षनिरीक्षकांची भंबेरी उडाली आणि शेवटी अध्यक्षपदाचा निवडीचा चेंडू पक्षनिरीक्षकांनी वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला आहे.
वेंगुर्ले भाजप मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. मागील भाजप तालुकाध्यक्षपदासाठी कुणीच इच्छुक नसलेल्या निवडणुकीत राज्यात व केंद्रात सत्ता आल्याने साहजिकच पक्ष प्रभाव वाढल्याचा प्रत्यक्ष अनुभव आजच्या निवडीत आला. वेंगुर्ले भाजप अध्यक्ष पदाच्या निवडीत प्रसन्ना देसाई, रवींद्र शिरसाट, बाळा राऊत, प्रशांत प्रभूखानोलकर, संजय गावडे, संदीप पाटील, शैलेश जामदार, दत्ताराम माळकर, विनायक गवंडळकर, सदाशिव लेले, हितेश धुरी या सद्य:स्थितीतील भाजपच्या दोन विचारसरणीतील उमेदवारांनी उमेदवारी दर्शविली. पक्षनिरीक्षक म्हणून सावंतवाडी तालुका भाजप अध्यक्ष मनोज नाईक, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, मिलिंद केळुसकर व भाजप तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साईप्रसाद नाईक यांनी अकराहीजणांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, अध्यक्ष निवडीत एकमत होऊ शकले नाही.
निवडी दरम्यान समर्थकांसह उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने मोठे वादंग निर्माण झाले. काहीतरी विपरीत होण्याची चिन्हे असतानाच पक्षनिरीक्षकांच्या वेळीच हस्तक्षेपाने हे प्रकरण शमले. अध्यक्षपद निवडीत अखेरपर्यंत एकमत न झाले नाही.
शेवटी पक्षनिरीक्षकांनी हात टेकून अध्यक्ष निवडीची परिस्थिती जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीला कळविली असून अध्यक्ष निवड वरिष्ठांकडूनच आठवडाभरात होणार आहे. यावेळी गावनिहाय ९३ पैकी ८५ बुथप्रमुख व स्थानिक समिती अध्यक्ष, सावंतवाडीचे शहराध्यक्ष अनंत नेवगी तसेच तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)