अर्जुन पुरस्कार प्राप्त अजय सावंत दोडामार्ग तालुक्याचे भूषण : राजेंद्र म्हापसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:13 PM2020-12-05T18:13:43+5:302020-12-05T18:16:13+5:30
Dodamarg police station, IndianArmy, Sindhudurgnews भारतीय सैन्य दलात भरती झाल्या नंतर टेंट पेंगिन (घोडेस्वारी) या खेळात २८ वर्षे तपश्चर्या करून अर्जुन पुरस्कार प्राप्त व राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान करण्यात आलेली व्यक्ती अजय सावंत ही माझ्या गावची आहे.
दोडामार्ग : भारतीय सैन्य दलात भरती झाल्या नंतर टेंट पेंगिन (घोडेस्वारी) या खेळात २८ वर्षे तपश्चर्या करून अर्जुन पुरस्कार प्राप्त व राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान करण्यात आलेली व्यक्ती अजय सावंत ही माझ्या गावची आहे.
राष्ट्रपातळीवर सर्वोच्च पुरस्कार प्रदान हा दोडामार्ग तालुक्यातील पहिला सरगवे गावचा सुपुत्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे तालुक्याचे भूषण आहे. अश्या व्यक्तीचा सत्कार माझ्या हस्ते होणे हे माझे भाग्य असल्याचे मनोगत जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सत्कार कार्यक्रमावेळी व्यक्त केले.
भारतीय सैन्य दलात घोडेस्वारी या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेले अजय सावंत यांना २०२० सालचा राष्ट्रपतींंच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत सरगवे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता . यावेळी म्हापसेकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निवृत्त कॅप्टन कृष्णा गवस, सत्कार मूर्ती अजय सावंत, त्यांच्या मातोश्री अनिता सावंत , ग्रामस्थ मधुकर सावंत, अर्जुन सावंत, ग्रामपंचायत सदस्य शंकर देसाई, पोलीस पाटील प्रमोद सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी निवृत्त कॅप्टन कृष्णा गवस यांनी युवकांना मार्गदर्शन केले. असे असंख्य अजय तालुक्यात घडणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
राजीव गांधी पुरस्काराचे ध्येय : अजय सावंत
अर्जुन पूरस्कार विजेते अजय सावंत म्हणाले, आपल्याला राष्ट्रपतींच्या हस्ते बहाल करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी गेली २८ वर्षे मी मेहनत घेत आहे. माझी २८ वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली. उरी असलेले स्वप्न पूर्ण झाले. या खेळात उंच शिखर गाठावे अशी जिद्द मनात होती. या पलीकडे सुद्धा भारताचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभो. आॉलंपिक-एशियन २०२२-२३ या वर्षात भारताचे नेतृत्व करून राजीव गांधी पुरस्कार प्राप्त करण्याचे ध्येय आहे.
ते मी पूर्ण करून गावाचे नव्हे तर जिल्ह्याचे , राज्याचे नाव उज्वल करीन असे अभिवचन आपल्या ग्रामस्थांना त्यांना दिले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाल्यानंतर माझा सत्कार करण्यासाठी अनेक फोन मला आलेत. परंतु पहिला सत्कार हा माझ्या गाव वाल्यांच्या हातूनच घ्यायचा होता ती ईच्छा माझ्या गाववाल्यानी पूर्ण केली. असे बोलताना अजय सावंत गहिवरुन आले.