सेना कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात, भाजप घरात...!

By admin | Published: October 13, 2015 08:48 PM2015-10-13T20:48:38+5:302015-10-14T00:03:59+5:30

रत्नागिरी पालिका : आरोप-प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरु

Army Corner, NCP's door, BJP house ...! | सेना कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात, भाजप घरात...!

सेना कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात, भाजप घरात...!

Next

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, प्रचाराला गती आली आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेने प्रभाग २ व ४मध्ये कॉर्नर सभांवर भर दिला असून, त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश शेट्ये यांना ‘कॉर्नर’ केले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेला मोठे आव्हान दिलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार उमेश शेट्ये व अन्य सहकारी उमेदवारांनी दारोदार जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार करण्यावर भर दिला आहे, तर भाजप मात्र घरात जाऊन गुप्तपणे प्रचार करीत आहे. एकूणच आरोप प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरू आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्ये यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने दोन्ही पक्षांचे नेते पोटनिवडणूक होत असलेल्या दोन्ही प्रभागात आतापासूनच ठाण मांडून आहेत. कोण कुठे जातोय, कोणाचे लागेबांधे आहेत, शब्द देऊन कोण फसवत आहे, याकडेही आतापासूनच लक्ष दिले जात असून, संबंधितांना दोन्ही बाजूने कानपिचक्या देण्यात आल्याचाही बोलबाला आहे. अनेक उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे प्रचाराच्या वेळी सर्वच पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असून, कॉर्नरसभांना मतदार, कार्यकर्ते व नेतेही हजेरी लावत आहेत. मात्र, प्रचारातील ही आघाडी १ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतांमध्ये प्रतिबिंबित किती होणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. उमेश शेट्ये सेनेतून बाहेर पडल्याने व आमने - सामने उभे ठाकल्याने त्यांच्याबाबत शिवसेनेत खुन्नस आहे. मात्र, उमेश शेट्ये यांच्या चक्री राजकारणाला शिवसेना किती पुरून उरणार त्यावरच या पोटनिवडणुकीतील सेनेचे यश अवलंबून राहणार आहे. सेनेच्या प्रचारात बंड्या साळवी, प्रमोद शेरे, मिलिंद कीर यांसारखे अनेक नेते कार्यरत आहेत. कीर व उमेश शेट्ये यांच्यात पत्रकारपरिषदांमधून जोरदार चकमक याआधीच झडली आहे. परंतु त्या आरोप - प्रत्यारोपांचा कोणाला किती फायदा होणार, हेसुध्दा मतदार राजाच ठरवणार आहे.
मिलिंद कीर यांच्या आरोपानुसार उमेश शेट्ये हे नगरपरिषदेला लागलेली वाळवी आहे की, शेट्ये यांच्या आरोपानुसार मिलिंद कीर हे सूर्याजी पिसाळांची अवलाद आहे, याचा फैसला आता मतदारांच्या हाती आहे.
शिवसेनेच्या कॉर्नर बैठका सुरू असल्या तरी राष्ट्रवादीने मात्र दारात जाऊन प्रचारावर भर दिला आहे. यानिमित्ताने मतदारांना भेटून उमेदवार व कार्यकर्ते राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विकासकामांची माहिती देत आहेत व विजयासाठी आशीर्वाद मागत आहेत. पालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांनी विकासासाठी काहीच केले नसून या दोन्ही प्रभागातील विकासासाठीच राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी मतदारांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. अनेक कारणांवरून उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये हे उमेदवार अपात्र ठरणार असून, पुन्हा पोटनिवडणूक होऊ नये म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सेनेचे नेते करीत आहेत. यातील कोणाचा राजकीय युक्तिवाद लोकांच्या पचनी पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
सेनेचा प्रचार कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात जात असताना भाजपचे उमेदवार व कार्यकर्ते मात्र घरात जाऊन प्रचार करीत आहेत. त्यात नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे पदाधिकारीही सहभागी होत आहेत.
मनसेच्या प्रचारास मात्र अजून वेग आलेला नाही. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते रत्नागिरीत दाखल होणार असून, त्यावेळी प्रचाराची खऱ्या अर्थाने रणधुमाळी होणार आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे नेते अंतिम टप्प्यात रत्नागिरीत प्रचाराला येतील, असे सांगितले जात आहे.
रत्नागिरी पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये, शिल्पा सुर्वे, रुबीना मालवणकर. शिवसेनेच्या ऋतुजा देसाई, पूर्वा सुर्वे, दिशा साळवी, तन्वीर जमादार. भाजपच्या सुहासिनी भोळे, नीलिमा शेलार, मनोज पाटणकर, निशा आलीम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन शिंदे, रचना आंबेलकर आणि अपक्ष आशिष केळकर हे उमेदवारही पालिकेच्या या निवडणूक रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत. (प्रतिनिधी)

जनतेची करमणूक
गेल्या काही वर्षात म्हणावी तशी विकासकामे न झाल्याने युती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विरोधकांमध्येही गेल्या काही दिवसात मरगळ आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या या पोटनिवडणुकीत जनतेचा कल काय असणार? याबाबत सांगता येणे कठीण आहे. मात्र, आरोप - प्रत्यारोपांमुळे जनतेची चांगलीच करमणूक होत आहे.



युतीत भांडणे : विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचा
रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सेना - भाजप युतीला निवडून दिले होते. मात्र, सत्तेवरून युतीत भांडणे झाली व नागरिकांच्या विकासाबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मुद्द्यांवर मते मागता, असेही अनेक ठिकाणी मतदारांनी काही उमेदवार व कार्यकर्त्यांना खडसावल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे शहरात झालेली विकासकामे हा पोटनिवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसून येत आहे.

Web Title: Army Corner, NCP's door, BJP house ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.