अर्जुनेतील बोगस झाडांचे लोण अन्य प्रकल्पांतही
By admin | Published: September 3, 2015 11:09 PM2015-09-03T23:09:41+5:302015-09-03T23:09:41+5:30
भ्रष्टाचार व्यापक : एजंटासह महसूल अधिकाऱ्यांनी केले उखळ पांढरे--अर्जुनेत भ्रष्टाचाराचे धरण भाग -३
विनोद पवार- राजापूर -अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील भ्रष्टाचाराची सुरुवात साधारण एक दशकापासून झाली आहे. प्रारंभी या प्रकल्पाच्या कालव्यांसाठीच्या भूसंपादनाची नोटीस निघताच एका महाभाग एजंटाने पाचल परिसरातील एका बड्या जमीन दलालाच्या मदतीने बाधित शेतकऱ्यांसाठी यशस्वी सापळा रचला व संपादित जमिनीमध्ये झाडे लावण्याचा सपाटा सुरु केला. त्यावेळी सुरु झालेली ही भ्रष्टाचाराची गटारगंगा आजतागायत वाहात आहे. मात्र, आता या भ्रष्टाचारात सामील होत एका वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याने कळसच रचण्याचे काम केले आहे. या बोगस झाडांच्या अनुदानाचे लोण आता अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्याचे नाते जामदा प्रकल्पाबरोबरच सिंंधुदुर्गातील काही प्रकल्पांशी जोडले गेल्याचेही पुढे आले आहे.
सुरुवातीला त्या एजंटाच्या नादी लागून काही संबंधित शेतकऱ्यांनी भू संपादन झाल्यानंतर आपापल्या जमिनीमध्ये हजारो झाडांची लागवड केली होती. एका महाभागाने तर एक हजार सागवानाची रोपे व तेवढीच केळीची झाडे लावून शासनाकडून रग्गड पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व सुरु असताना महसूल सेवेतीलच एका बड्या महिला अधिकाऱ्याच्या पतीने यामध्ये सहभाग घेतला. त्याच्या साथीने बोकाळलेल्या त्या एजंटाने अर्जुना धरणाच्या कालव्यांच्या संपादित जागेत झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. तेवढ्यावरच समाधान न झाल्याने पूर्व परिसरातील जामदासह अन्य प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात फळझाडांसह जंगली झाडांचीही लागवड केली गेली होती. त्यानंतर हा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाला होता. मात्र, महसुली अधिकाऱ्यांच्या कागदोपत्री बनेल अहवालांमुळे संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती. या संधीचा अचूक फायदा उठवत पुढील काही अधिकाऱ्यांनी आपापल्या तुंबड्या भरण्याचे काम पार पाडले. आता आलेला हा महसुली बडा अधिकारीही तीच री ओढत आहे. नवा महसुली अधिकारी रुजू होताच मधल्या काळात शांत बसलेल्या त्या एजंटाने व त्याच्याच गोतावळ्याने लाडीगोडी लावत नवीन अधिकाऱ्याशी संधान साधले. त्याची मर्जी संपादन झाल्यानंतर आपले पत्ते पुन्हा टाकायला सुरुवात केली. त्या खेळाला महसुली अधिकाऱ्याने हात दिल्याने या भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढली. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा बभ्रा होताच नेहमी पाचल बाजारपेठेत दिसणाऱ्या त्या एजंटाने तालुक्यातून पोबारा केला असला तरी पाचल बाजारपेठेत जमीन खरेदी-व्रिकीचे व्यवहार करणारा त्याचा दलाल मात्र कार्यरत आहे.
कारवाईच्या भीतीने एजंट गायब
या प्रकरणाबाबत तक्रारी होऊ लागल्यानंतर त्या एजंटासह महसूलचा अधिकारी संभाव्य कारवाईच्या भीतीने गायब झाला असल्याची चर्चा मात्र पाचल परिसरात नाक्यानाक्यावर सुरु आहे. अर्जुना प्रकल्प उभारणीच्या पहिल्या दिवसापासूनच एजंटांची टोळी याठिकाणी कार्यरत आहे. या भागात अनेक अशिक्षित लोक राहात असल्याने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा या टोळीकडून घेतला जात आहे. सध्या असे अनेक प्रकार सुरु आहेत. ग्रामीण भागातील या गोरगरीब जनतेच्या जमिनी बड्या किमतीत विकून कमिशनसह जमिनीच्या रकमेतील काही रक्कमही हडप करण्याचे प्रकार सुरु आहेत.