हेवाळेतील हत्तींचा बंदोबस्त करा
By admin | Published: June 17, 2016 10:02 PM2016-06-17T22:02:33+5:302016-06-17T23:29:19+5:30
शेतकऱ्यांचे उपवनसंरक्षकांना निवेदन : हत्ती पकड मोहीम राबविण्याची केली मागणी
दोडामार्ग : हेवाळे गावात हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्तांना तातडीने अटी व नियम न लादता नुकसानभरपाई अदा करावी, अशी मागणी हेवाळे ग्रामस्थांनी प्रभारी उपवनसरंक्षक एम. एस. भोसले यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन गावचे प्रभारी सरपंच संदीप देसाई यांनी भोसले यांना दिले. तसेच वनसंज्ञा अनिर्णीत क्षेत्र आदींबाबत गावकऱ्यांनी भासले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा वावर आहे. मोठ्या प्रमाणात या हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या भात शेती व बागायतीचे नुकसान केले आहे. हेवाळेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, हत्तींची नुकसानभरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. वनसंज्ञा अनिर्णीत क्षेत्र आदी ठिकाणी हत्तींनी नुकसान केल्यास वनविभागाचे नियम आडवे येतात परिणामत: संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी हेवाळेतील प्रभारी सरपंच संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी येथील वनविभाग कार्यालयावर धडक देत प्रभारी उपवनसंरक्षक एम. एस. भोसले यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत वनक्षेत्रपाल सचिन आठवले उपस्थित होते.
१९७५च्या वन संपादन कायद्यान्वये संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात खासगी जमीन देत शेतकऱ्यांनी आपली विविध सर्व्हे नंबरमधील जमीन मुक्त करण्याची केलेली मागणी आपण शासन स्तरावर मांडू. याबाबत योग्य ती माहिती घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, हत्तीपकड मोहीम हा केंद्रशासन अखत्यारित प्रश्न असल्याने तुमच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवू, असे सांगितले.
गावात वन व्यवस्थापन समितीचे काम चांगले असून अधिकाधिक वृक्षलागवड करा, सवलतीच्या दरात अन्य शेतकऱ्यांनासुद्धा गॅस शेगडीचे वाटप करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हेवाळे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ काका देसाई, माजी ग्रा. पं. सदस्य तातोबा देसाई, शैलेश गावडे, दयानंद गवस, लक्ष्मण गवस, तानाजी देसाई, सत्यवान गवस, समीर देसाई, विलास नाईक, उत्तम ठाकूर, महादेव नाईक, सूर्याजी राणे, सखाराम कुंभार, आत्माराम देसाई, संभाजी देसाई, मनोहर ठाकूर,
मधुसूदन गवस, हनुमंत गवस, भीमराव राणे, वासुदेव गवस, मोहन हेवाळकर, शिवाजी देसाई, वामन देसाई,
दयानंद सावंत, कृष्णा देसाई, संतोष देसाई, जयसिंग देसाई, विजय देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्थानिक सुरक्षा रक्षक नियुक्त करणार
हेवाळे गावात हत्तींनी केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. काही शेतकऱ्यांना तर नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेकजण वनसंज्ञा अनिर्णीत क्षेत्राच्या जमिनीत नुकसान झाल्याने नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अटी व नियम न लावता त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी व हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कायमस्वरूपी गस्तीपथक नेमण्यात यावे, असेही सुचविण्यात आले.
यावेळी भोसले यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली, तर हत्तींचा वावर आहे तोवर वनखात्याचे एक खास गस्तीपथक हेवाळे गावात तैनात करण्याबरोबरच स्थानिक सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले.