अमली पदार्थ विक्रेत्यांबरोबर पोलिसांची आर्थिक मांडवली, मनसे नेते परशुराम उपरकरांचा गंभीर आरोप
By सुधीर राणे | Published: June 19, 2023 02:12 PM2023-06-19T14:12:55+5:302023-06-19T14:14:00+5:30
..तरच जिल्हा अमलीपदार्थ मुक्त होईल
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात फसत चालली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अमलीपदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह साजरा करताना एक वार्षिक कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका घेवू नये. काही पोलिस अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांबरोबर आर्थिक मांडवली करीत आहेत असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. पोलिस अधिक्षक यापुढील कालावधीत धडक मोहीम राबवून यावर कडक कारवाई करतील का? असा सवालही उपरकर यांनी केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात मुंबई, गोवा, कर्नाटक आदी भागातून गांजा, हकीम, चरस असे अमलीपदार्थ विक्रीसाठी येतात. हे पदार्थ विक्री करणारे मोठे रॅकेट आहे. महाविद्यालयाच्या बाहेर तसेच जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर तरुणांसह पर्यटकांना राजरोसपणे हे अमलीपदार्थ विक्री केले जातात. त्यामूळे तरुणाईचे आयुष्य उध्वस्त होत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण चोरी तसेच अन्य गुन्हे करीत आहेत.
सजग नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली तर अनेक पोलिस संबधित अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांना सूचना देऊन सावध करतात. त्यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अमलीपदार्थ नेमके कोठून येतात? कोण विक्री करतो? याच्या मुळापर्यंत पोलिस गेल्यास जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करता येईल. नागरिक, पोलिस, सर्वपक्षीय नेते यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास जिल्हा अमलीपदार्थ मुक्त होईल.