आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रांचे नियोजन काटेकोरपणे करावे
By admin | Published: January 18, 2015 12:34 AM2015-01-18T00:34:42+5:302015-01-18T00:36:44+5:30
दीपक केसरकर : यात्रा पूर्वतयारीच्या बैठकीत आदेश
सिंधुदुर्गनगरी : भाविकांच्या गर्दीचा विचार करून रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था, आरोग्य यंत्रणा यादृष्टीने ट्रस्ट, व्यवस्थापकीय मंडळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रांचे नियोजन व अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे आदेश पालकमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत आरोसकर, कुणकेश्वर ट्रस्टचे विश्वास भुजबळ, पुंडलिक नाणेरकर, एकनाथ चव्हाण, कुणकेश्वरचे सरपंच चंद्रकांत घाडी, डांगमोडेच्या सरपंच गायत्री ठाकूर, मालवणच्या सभापती सीमा परुळेकर, आंगणेवाडी ट्रस्टचे मंगेश आंगणे, नरेश आंगणे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित असणारी रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून कुणकेश्वर व आंगणेवाडी रस्ते दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्ण करा. यात्रास्थळी गर्दी वाढणार आहे असा अंदाज असल्यास पार्किंग वाढवावे. पार्किंगच्या ठिकाणी धुळीचा त्रास होत असल्यास त्यावरील योग्य त्या उपाययोजना करा व पार्किंगची व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. आरोग्य विभागाने यात्रास्थळी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोत तपासून घ्यावेत.
दीपक केसरकर म्हणाले, जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय व्यवस्थेसाठी किमान २ हजार चौरसफूट जागा मंदिर परिसरात उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तेथे पेन्डॉल उभे करावेत. कुणकेश्वर येथे महाद्वार कमानीपासून वर जाणाऱ्या मार्गावरील ठिकठिकाणी तुटलेल्या पायऱ्या दुरुस्त करून घ्याव्यात आणि परतीच्या मार्गावरील सर्व उतार काढून त्याठिकाणी एकसारख्या उंचीच्या पायऱ्या किमान महाद्वारापर्यंत तयार करून घ्याव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्यामार्फत ही दुरुस्ती करून घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास द्यावी व हे काम यात्रेपूर्वी होणे जरुरीचे आहे.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, परिवहन विभागाने यात्रा काळात कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. यात्रा काळात भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन येणाऱ्या वाहनांचा प्रवाह मर्यादित व नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्हा सरहद्दीवर आणि घाटांच्या पायथ्यांशी तपासणी नाके उभारावेत. प्रस्तावित कारवाई व नियोजनाबाबत पुरेशी प्रसिद्धी द्यावी.
यात्रास्थळी देवस्थानांना लागणारी वीज, विजेच्या जादा जोडण्या व विजेसंबंधी सर्व कार्यवाही यात्रा काळापुरती महाराष्ट्र विद्युत मंडळानेच स्वत:च्या अधिकारात व जबाबदारीवर करावी. तसेच बीएसएनएलने यात्रा कालावधीत यंत्रणा सुरळीत ठेवावी, असे आदेशही दीपक केसरकर यांनी
दिले. (प्रतिनिधी)