सभापती बदलाच्या कारवायांना सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 11:15 PM2016-01-22T23:15:13+5:302016-01-23T01:07:34+5:30
सेनेचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर : राजापूर पं. स. मध्ये पडद्यामागे रंगले नाट्य
राजापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन सभापती व उपसभापती बदलण्याचा शिवसेनेच्याच काही सदस्यांचा डाव राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी हाणून पाडला आहे. त्यामुळे विद्यमान सभापती व उपसभापती यांना मुदतवाढ मिळाली आहे.
गेले काही दिवस राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलांबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या. राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण बारा सदस्यांपैकी सहा सदस्य शिवसेनेचे, चार काँग्रेसचे व दोन राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीने साथ दिल्यामुळे शिवसेनेने सभापती पदावर बाजी मारली. त्यात राष्ट्रवादीने उपसभापतिपद आपल्या पदरात पाडून घेतले. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बिनसल्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा काँग्रेसचा हात धरला होता. त्यानंतर झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीदरम्यान समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठीचा वापर केला गेला व त्यामध्ये नशिबाची साथ मिळाल्याने दोन्ही पदे सेनेकडे गेली.
गेल्या काही दिवसांत शिवसेनेतील काही मंडळींना सभापती व उपसभापती बदलाचे डोहाळे लागले. त्यांनी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीची गरज पडणार होती. त्यासाठी सेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांना पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. राष्ट्रवादीच्या त्या दोन्ही सदस्यांना घेऊन या, त्यानंतर विद्यमान सभापती व उपसभापतींचे राजीनामे घेतो असा सल्ला सेनेच्या वरिष्ठांनी दिला. राष्ट्रवादीचे सदस्य कुठल्याही क्षणी सेनेच्या ताब्यात जातील, याची कुणकुण लागल्याने राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी प्रखर विरोध दर्शविलाच, शिवाय आपले सदस्य त्यांच्याकडे जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. राष्ट्रवादीच्या या जोरदार व्यूहरचनेमुळे सभापती व उपसभापती बदलाबाबतचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान सभापती सोनम बावकर व उपसभापती उमेश पराडकर यांना आपोआपच मुदतवाढ मिळाली आहे. आता पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपर्यंत हे दोन्ही पदाधिकारीच कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकरणातून शिवसेनेचा अंतर्गत संघर्ष मात्र चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)