आरेत जमिनी खालसा भोगवटा वर्ग मोहीम
By admin | Published: December 14, 2014 09:22 PM2014-12-14T21:22:36+5:302014-12-14T23:53:44+5:30
राजस्व अभियान : शासनाच्या नवीन अधिनियमांची अंमलबजावणी
गुहागर : शासनाच्या नवीन अधिनियमानुसार कुळकायद्याने प्राप्त झालेल्या व ‘३२ म’नुसार खरेदी झालेल्या जमिनी नि. स. प्र.ऐवजी खालसा भोगवटा वर्ग-१ करण्याची मोहीम गुहागर तालुक्यात सुरु झाली आहे. आरे येथून या मोहिमेला शुभारंभ करण्यात आला.
कूळवहिवाटीच्या जमिनीची खरेदी होऊनही सातबारा उताऱ्यांवर नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग-२ असा शेरा कायम राहिल्याने अशा जमिनींच्या कोणत्याही व्यवहारासंबंधी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या दि. १६ जुलैच्या परिपत्रकानुसार सदर जमिनी खालसा वर्ग - १ करण्याबाबतची माहिती गुहागरचे मंडल अधिकारी समीर देसाई यांनी दिली. उपसभापती सुरेश सावंत यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन कुळांनी खऱ्या अर्थाने मालक व्हावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
यावेळी प्रकाश सावंत, सरपंच शलाका माने, प्रभाकर धावडे, नंदकुमार भोसले, तलाठी गजानन धावडे, व्ही. एस. ओंबासे, डी. के. नागरे, अनिल राठोड आदी उपस्थित होते. या अभियान कार्यक्रमाला १०६ खातेदार उपस्थित होते. विहीत नमुन्यातील अर्जासह १०२ खातेदारांकडून आकाराच्या ४० पट नजराणा फी भरुन घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)