चाकू सुऱ्याचा धाक दाखवून चोरी, कर्नाटकातील चोरटे ओरोस येथे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 01:51 PM2020-03-10T13:51:54+5:302020-03-10T13:53:08+5:30
चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापूर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ओरोस : चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापूर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
४ मार्च रोजी मध्यप्रदेश-धार येथील सराईत गुन्हेगारांनी रात्री यल्लापूर (कर्नाटक) येथील एका व्यक्तीला चाकू सुºयाचा धाक दाखवून रोख रक्कम १ लाख रुपये व सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केली होती. तसेच चारचाकी घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी यल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुह्याची आणि दुचाकी चोरीची कल्पना येथील पोलीसदलाला दिली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. या आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली होती. तसेच ओरोस जिजामाता चौक येथे महामार्गावर अचानक नाकाबंदी करून तपासणी केली असता पावणे पाचच्या सुमारास निळ्या काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीने दोन व्यक्ति संशयितरित्या प्रवास करताना या एलसीबीच्या पथकाला दिसून आला. त्यांना थांबण्याचा ईशारा पोलिसांनी केला असता त्यांनी दुचाकी तेथेच टाकून पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत त्यांना तेथेच ताब्यात घेतले. त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन सोन्याची मंगळसूत्रे, दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन सोन्याच्या बांगड्या, एक चांदीचा पेला, एक चांदीचे नाणे, रोख रक्कम २५ हजार आणि दुचाकी असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी यल्लापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.
सातोसेत हाणामारी दोघे गंभीर जखमी
बांदा : सातोसे - देऊळवाडी येथे वैयक्तिक वादातून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून विजय अनंत मांजरेकर (४५) व चंद्रकांत सुरबा नागवेकर (७२) अशी त्यांची नावे आहेत.
विजय मांजरेकर यांनी फावड्याने मारहाण केल्याचे चंद्रकांत नागवेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर भारती विजय मांजरेकर यांनी आपले पती विजय मांजरेकर यांना चंद्रकांत नागवेकर व अनिल शिरोडकर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत बांदा पोलिसांत सुरु होते.
सातोसे - देऊळवाडी येथील नागवेकर व मांजरेकर कुटुंबियांमध्ये वाद आहेत. वाळू उत्खननावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.